लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : उसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी तत्कालीन वरिष्ठ सामाजिक सुरक्षा साहाय्यक अधिकाऱ्याने भविष्य निर्वाह निधी संघटन (पीएफ) कार्यालयातील १२ संगणक चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वागळे इस्टेट येथे भविष्य निर्वाह निधी संघटनचे (पीएफ) क्षेत्रीय कार्यालय आहे. या कार्यालयात वरिष्ठ सामाजिक सुरक्षा साहाय्यक अधिकारी संबंधित व्यक्ती कार्यरत होते. २०२१ ते २०२३ या कालावधीत कार्यालयातील जंगम वस्तूंची खरेदी, वस्तूंचे वाटप, सुरक्षा, दुरुस्ती आणि विल्हेवाट करणे यासह शिपायांवर आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर पर्यवेक्षण ठेवण्याचे कामकाज संबंधित अधिकाऱ्याकडे यांच्याकडे होते. त्यांच्या कामाचा कालावधी पूर्ण झाल्याने येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची नेमणूक नगद विभागात केली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगणकांची मोजणी केली असता, १८५ पैकी १२ संगणक हे चोरीला गेल्याचे समोर आले होते. त्यानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पडताळणीत संबंधित वरिष्ठ सामाजिक सुरक्षा साहाय्यक अधिकाऱ्याने २०२१ ते २०२३ या कालावधीत हे संगणक चोरी केले होते. आठ लाख रुपये उसने घेतल्याने ते फेडण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. साहाय्यक भविष्य निधी आयुक्तांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.