ठाणे :  राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा भागात शिवसेनेने लसीकरण महोत्सव घेतल्यानंतर राष्ट्रवादीने आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या किसननगर आणि जांभळी नाका भागात लसीकरण शिबीर घेण्याचे ठरविल्याने संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या दोन्ही ठिकाणी लसीकरण शिबीर घेण्यास परवानगी देण्याच्या मुद्दय़ावरून ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यात खडाजंगी होऊन शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार सोमवारी महापालिकेत घडला. तसेच कळव्यात शिवसेनेनेच लसीकरणाचे बॅनर फाडल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला असून यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

कळवा परिसरात महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने शनिवारी करोना लस महोत्सव आयोजित केला होता. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद रंगला होता. या महोत्सवासाठी लसीकरण केंद्रात शिवसेनेचे फलक लावण्यात आले होते. यावरून शिवसेनेवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीका केली होती. तसेच कळव्यात सेनेच्या नेत्यांचे फोटो लावण्याचे कारण काय, पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा हे लवकरच सेनेत प्रवेश करणार आहेत का, असा प्रश्नही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपस्थित केला होता.

शिवसेनेने कळव्यात लस महोत्सव घेतल्यानंतर राष्ट्रवादीने पालकमंत्री एकनाथ िशदे यांचा बालेकिल्ला असलेल्या किसननगर येथील आयटीआय सर्कलजवळ आणि जांभळी नाका भागात लसीकरण शिबीर घेण्याचे ठरविले आहे. या शिबिराला परवानगी मिळावी यासाठी आनंद परांजपे हे सोमवारी दुपारी महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात गेले होते.  तिथे परांजपे यांनी शिबिरासंदर्भातील पत्र आणि या शिबिरांसाठी येणारा खर्च म्हणून २० लाखांचा धनादेश दिला. तो घेण्यास महापौर म्हस्के यांनी नकार दिला. शिबिरांसाठी कार्यकर्ते पैसे खर्च करत असल्याचे महापौरांनी सांगितले होते म्हणूनच त्यांना हा धनादेश देत असल्याचे परांजपे यांनी या वेळी सांगितले.

यावरून महापौर म्हस्के आणि परांजपे यांच्यात खडाजंगी होऊन शाब्दिक चकमक झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर महापौरांनी शिबिरांचे पत्र स्वीकारले. या संदर्भात महापौर नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

कळवा येथील लसीकरण महोत्सवाकरिता राष्ट्रवादीने परिसरात लावलेले बॅनर शनिवारी पहाटे अनोळखी व्यक्तींनी फाडले होते.  दरम्यान, हे बॅनर फाडण्यामागे शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे हेच असल्याचा गौप्यस्फोटही आनंद परांजपे यांनी केला आहे. हे बॅनर गणेश कांबळे यांनीच फाडले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. अरिवद मोरे यांनी या संदर्भात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे, असेही त्यांनी सांगितले.