ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागातील भरती प्रक्रिया ऑनलाइन राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला खरा; पण शेकडो उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर ऐनवेळी संगणकप्रणाली बिघडल्याने ही संपूर्ण प्रक्रिया नव्याने ‘ऑफलाइन’ घेण्याचे पालिकेला जाहीर करावे लागले. पालिकेच्या अशा कारभाराचा उमेदवारांना मात्र फटका बसला असून यासाठी त्यांना आता पुन्हा खर्च करावा लागणार आहे.

ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाकडील महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर विविध पदे भरण्यात येत आहेत.  त्यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सुमारे हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरून पाठवले. मात्र आता पालिकेने अचानक ‘ऑनलाइन’ प्रक्रिया रद्द केल्याचे जाहीर केले. ही संपूर्ण प्रक्रिया ‘ऑफलाइन’ करण्याचे जाहीर करताना त्यासाठी पालिकेने ५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.  मात्र, त्यासाठी उमेदवारांना स्पीड पोस्ट, कुरिअरचा खर्च पुन्हा करावा लागणार आहे.

विशेष म्हणजे, काही उमेदवारांनी महापालिकेच्या कार्यालयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना टाळाटाळ करणारी उत्तरे देण्यात आली.