नीलेश पानमंद, जयेश सामंत
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील १२७ रस्त्यांच्या कामांसाठी राज्य सरकारकडून २५० कोटींचा निधी मिळत असतानाही या रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू आहे. महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडून गेल्या दोन महिन्यांपासून याबाबत कोणतीही प्रगती झालेली नसल्याने या रस्त्यांची कामे पावसाळय़ापूर्वी होण्याची शक्यता नाही. ठरावीक ठेकेदारांचे ‘चांगभल’ करण्याच्या कसरतींमुळे या कामांचा भार ऐन पावसाळय़ात ठाणेकरांच्या माथी मारला जाण्याची चर्चा अगदी उघडपणे सुरु झाली आहे.
गेल्या वर्षी पावसाळय़ात ठाणे महापालिका क्षेत्रात जागोजागी रस्त्यांवर खड्डे पडले होते. यावरून नागरिकांत तीव्र नाराजी निर्माण झाल्यानंतर त्यांना उत्तरे देताना लोकप्रतिनिधीही हतबल झाल्याचे चित्र दिसत होते. या पार्श्वभूमी वर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दौऱ्यात दोषी आढळलेल्या तीन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. तसेच रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी राज्य सरकारने २५० कोटींचा निधी देऊ करत आर्थिक अडचणीत सापडलेल्या पालिकेला दिलासाही दिला. या निधीच्या आधारे पालिकेने १२७ रस्त्यांची यादी करत त्या्च्या कामासाठी निविदा काढल्या होत्या. यूटीडब्लूडी, बीटूमेन (डांबर) व काही काँक्रीट रस्त्यांची वर्गवारी करत तीन वेगवेगळय़ा निविदा काढल्या होत्या. परंतु, ही कंत्राटे ठरावीक ठेकेदारांच्याच झोळीत पडावीत, यासाठी अन्य ठेकेदारांवर माघारीसाठी दबाव आणला गेल्याचे आरोप झाले. त्याबाबतचा संशय कायम असतानाच आता ही निविदा प्रक्रिया अंतिम होत नसल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. पावसाळय़ापूर्वी निविदा प्रक्रिया अंतिम न झाल्यास अभियांत्रिकी विभागालाच रस्त्यांची कामे हाती घ्यावी लागण्याची शक्यता आहे.
ठरावीक ठेकेदारांसाठीच प्रक्रियेला विलंब?
यूटीडब्लूडी, बीटूमेन (डांबर) आणि काही काँक्रीट रस्त्यांची वर्गवारी करत अभियंता विभागाने तीन वेगवेगळय़ा निविदा काढल्या आहेत. या निविदा २१ मार्च २०२२ पर्यंत भरण्याची मुदत होती. ठेकेदारांचा चांगला प्रतिसाद मिळूनही कंत्राटदार निश्चित करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या कामांच्या निवीदांमध्ये अन्य ठेकेदारांनी सहभागी होऊच नये यासाठी त्यांच्यावर दबाव आणला गेल्याची जाहीर चर्चा सुरु होती. त्यानंतरही काही ठेकेदारांनी हा दबाव झुगारत निविदा दाखल केल्या. परिणामी महापालिकेतील संगनमताची साखळी मोडण्याची चिन्हे निर्माण झाली. आता ही साखळी न मोडण्यासाठी नको असलेल्या ठेकेदारांना बाद करण्यासाठीच प्रक्रिया लांबवली जात असल्याची कुजबुज पालिकेच्या वर्तुळात आहे. दरम्यान प्राप्त झालेल्या निविदांची छाननी प्रक्रीया अत्यंत पारदर्शक पद्धतीने सुरु असून त्यामुळे निविदा अंतिम होऊ शकलेल्या नाहीत, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
कंत्राटदार आधीच निश्चित?
डांबरी रस्त्यांसाठी मागविण्यात आलेल्या निविदेत केआर कन्स्ट्रक्शन, शहा ॲण्ड पारेख कंपनी, न्यू इंडिया रोडवेज आणि अस्फाल्ट इंडीया कार्पोरेशन या चार कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. ‘यूटीडब्ल्यूडी’ प्रकारच्या कामात एन.ए. कन्स्ट्रक्शन, अस्फाल्ट इंडीया कार्पोरेशन या दोनच कंपन्यांनी निविदा दाखल केल्या आहेत. काँक्रीट प्रकारच्या रस्ते बांधणीसाठी एन.ए. कन्स्ट्रक्शन, अस्फाल्ट इंडीया कार्पोरेशन, श्रीजी, के.ई. इन्फ्रा या कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. असे असले तरी ही कामे कोणत्या कंपनीला मिळणार याची जाहीर चर्चा खूप आधीपासूनच महापालिका वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर ठेकेदार निश्चित करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली जात असून काटेकोरपणे छाननी केल्यानंतरच ठेकेदारांची नावे अंतिम होतील. -रामदास शिंदे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठा.म.पा