टेंभीनाका येथील नवरात्रौत्सवामुळे लागू करण्यात आलेल्या वाहतूक बदलांचा परिणाम मंगळवारी ठाण्यात दिसून आला. शहरातील खोपट, जांभळीनाका, तलावपाली, गडकरी रंगायतन चौक, बाजारपेठ या भागात पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक, नौपाडा येथे जाणाऱ्या वाहन चालकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. वेळेत रिक्षा उपलब्ध होत नसल्याने रेल्वे स्थानकाखालील रिक्षा थांब्यावरही प्रवाशांची गर्दी झाली होती. ५ ऑक्टोबरपर्यंत हे वाहतूक बदल लागू असल्याने पुढील आठवडाभर सकाळी आणि रात्रीच्या वेळेत वाहन चालकांना आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> मुंबईतील डाॅक्टरची डोंबिवलीतील स्वस्थम आयुर्वेदच्या संचालकांकडून ८५ लाखाची फसवणूक

टेंभीनाका येथील चौकामध्ये नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूकीमध्ये बदल करून येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून टेंभीनाक्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना जांभळीनाका मार्गे तसेच ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे जांभळीनाका बाजारपेठ किंवा खोपट मार्गे वाहतूक करावी लागत आहे. मंगळवारी सकाळपासून या वाहतूक बदलाचा परिणाम ठाणेकरांना सहन करावा लागला. खोपट मार्गावर वाहनांचा भार वाढला होता. त्यामुळे वंदना सिनेमागृह ते खोपट येथील मनोरपाड्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच चरई भागातही वाहतूक कोंडी झाली होती. तर ठाण्याहून तलावपालीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गावर चिंतामणी चौक ते रेल्वे स्थानक परिसर आणि जांभळीनाका बाजारपेठेपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी २ नंतरही वाहतूक कोंडी कायम होती. त्यामुळे सॅटीस पूलाखाली पुरेशा रिक्षा प्रवासांना उपलब्ध होऊ शकल्या नाही. त्याचा परिणाम रिक्षा थांब्यांवर होऊन प्रवाशांची थांब्यावर लांब रांग दिसून आली. बस थांब्यांवरही प्रवाशांच्या रांगा होत्या. कोर्टनाका भागात जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे न्यायालय, जिल्हा शासकीय रुग्णालय आहे. परंतु वाहतूक बदलामुळे आणि कोंडीमुळे अनेकांना स्थानक परिसर ते कोर्टनाका पर्यंत पायी जाण्याची वेळ आली.