शिंदे यांच्या बंडखोरीनंतर डोंबिवलीतील जुन्या ज्येष्ठ निष्ठावान शिवसैनिकांनी गुपचिळी धरली होती. हे निष्ठावान कोणाची बाजू घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. काही ज्येष्ठ शिवसैनिकांनी बंडखोरीच्या वातावरणात मातोश्री तर काहींनी ठाण्यात लुईसवाडी येथे जाऊन ठाकरे, शिंदे यांना समर्थन जाहीर केले होते. शुक्रवारपासून शहराच्या विविध भागात डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे फलक शहराच्या मुख्य प्रवेशव्दारावर लावले आहेत.

हे फलक अनेकांच्या चर्चेचे आणि आश्चर्यचकित करणारे आहेत. भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी शिंदे, फडणवीस यांचे अभिनंदन करणारे फलक लावले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून व्दिधा मनस्थितीत असलेल्या शिवसैनिक, भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आम्ही दुजाभाव न ठेवता शिवसेनेतील ज्येष्ठांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केल्याच्या फलकावर शिवसेनाप्रमुख, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे, आनंद दिघे यांच्या छब्या प्रसिध्द केल्या आहेत. फलकावरील नेत्यांची घुसळण नको म्हणून शिवसेनाप्रमुख, उध्दव, आदित्य ठाकरे यांच्या छब्या फलकाच्या एका बाजुला, खा. शिंदे, आनंद दिघे यांच्या छब्या दुसऱ्या बाजुला छापण्यात आल्या आहेत. फलकावर शिवसेना-भाजप युतीच्या विजयाची घोषणा रमेश म्हात्रे यांनी केली आहे. रमेश म्हात्रे यांचे समर्थक कार्यकर्ते जितेने पाटील, योगेश जुईकर, कौस्तुभ शिसोदे यांनी मात्र एकनाथ शिंदे यांचे अभिनंदनाचे फलक लावले आहेत.

डोंबिवलीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, त्यांचे दोन्ही चिरंजीव माजी नगरसेवक दीपेश व जयेश म्हात्रे यांनीही मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन करताना फलकावर शिवसेनाप्रमुख, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, आनंद दिघे, गोपाळ लांडगे यांच्या छब्या प्रसिध्द केल्या आहेत. अलीकडेच भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेल्या रवी पाटील, नितीन पाटील, रंजना नितीन पाटील या कुटुंबाने फक्त एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करणारे फलक झळकावले आहेत. भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेल्या महेश पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी, गृहमंत्री अमित शहा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिंदे, फडणवीस यांचे अभिनंदन करणारे फलक शहरात लावले आहेत. शिवसेनेत दाखल होऊनही महेश पाटील यांनी आमदार रवींद्र चव्हाण, भाजप नेत्यांच्या छब्या फलकावर लावल्याने कार्यकर्त्यांसह अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. माजी नगरसेवक विकास म्हात्रे, पत्नी नगरसेविका कविता यांनी भाजप नेत्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन करणारे फलक झळकावले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवलीतील मोजक्या निष्ठावान शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे समर्थन केले होते. या समर्थन देणाऱ्या काही निष्ठावानांनी शिंदे, फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे निष्ठावान नक्की कोणाच्या बाजुचे असाही संभ्रम या फलकांमुळे निर्माण झाला आहे. अनेक शिवसैनिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने ते कोणत्या गटाचे हे अद्याप उघड झालेले नाही. याविषयी काही ज्येष्ठ शिवसैनिकांना संपर्क साधला त्यांनी प्रतिसाद दिला नाही.