अदाणी समूहाच्या देशविदेशात शेकडो बोगस कंपन्या असून अब्जावधी रूपयाचा भ्रष्टाचार समोर येत आहे. एल.आय.सी., स्टेट बँक, एअरपोर्ट, रेल्वे अशा ठिकाणची गुंतवणूक धोक्यात आणली असतानाही केंद्रातील भाजपा सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी सोमवारी ठाण्यात केला.
हेही वाचा- ठाणे महापालिकेतील भ्रष्ट कारभारावर कारवाई कधी ? आमदार संजय केळकर यांची आयुक्तांकडे विचारणा
केंद्रातील भाजपा सरकार अदानी समूहाच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत काँग्रेसने सोमवारी देशभर निदर्शने केली. अशाचप्रकारे ठाण्यातील एल्.आय् .सी.कार्यालयाच्या मुख्यालयासमोर ठाणे काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्यावेळी काँग्रेसचे नेते नसीम खान यांच्यासमवेत ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रदेश काँग्रेस सचिव मनोज शिंदे, ठाणे प्रवक्ते सचिन शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. देशभरातील सर्व सामान्य जनतेचा पैसा हा विश्वासार्ह ठिकाणी गुंतवणूक होतो. एल.आय.सी. किंवा स्टेट बँक यांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास कमावला होता म्हणूनच या ठिकाण सर्वसामान्य जनता आपल्या मेहनतीची पूंजी गुंतवत असते. या संस्थेची गुंतवणूक केंद्रातील सरकारच्या दबावामुळेच अदाणी समूहात करण्यात आली, असा आरोप नसीम खान यांनी यावेळी केला.
हेही वाचा- कल्याणमध्ये केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने
आता अदाणी समूहाच्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश करणाऱ्या हिडनबर्ग संसदेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे किंवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी नसीम खान यांनी यावेळी केली. हि मागणी मान्य झाली नाहीतर काँग्रेस जनआंदोलन उभारेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.