सागर नरेकर

एकेकाळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बालेकिल्ले असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांपासून या पक्षांची पडझड सुरू आहे. शिवसेनेने यापूर्वीही आपला पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र २०१४ नंतर या स्पर्धेत भाजपही पुढे आला आहे. मुरबाड आणि शहापूर नगरपंचायतीत भाजपने कमावलेली ताकद इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे.  

Congress Leader Mukul Wasnik, akola lok sabha seat, Mukul Wasnik Criticizes Modi Government, Alleges Anarchy in the country, BJP in power, lok sabha 2024, election campagin, akola news,
“भाजपच्या सत्तेत देशात अराजकता,” काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांची घणाघाती टीका; म्हणाले, “पराभव दिसत असल्याने…”
The seat allocation of the three component parties in Mahavikas Aghadi was finally announced on Tuesday
मविआचे ठरले, युतीत संभ्रम; काँग्रेस, ठाकरे-शरद पवार गटांचे जागावाटप पूर्ण
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
excitement in the NCP Congress After the announcement of candidature of Sunil Tatkare
रायगड : सुनील तटकरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह…

आगरी, कुणबी आणि कोळी बांधवांची संख्या अधिक असलेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख  आहे. जिल्ह्यात सध्याच्या घडीला शिवसेना आणि भाजपात सर्वात मोठी राजकीय स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेमध्ये पूर्वीचे ताकदवान पक्ष असलेले कॉंग्रेस आणि  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या मुरबाड आणि शहापूर या नगरपंचायत निवडणुकांमध्येही थेट लढत शिवसेना आणि भाजपात पाहायला मिळाली.  शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि  केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या निवडणुकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर प्रचार केला. केंद्रीय मंत्र्यांनी तर गल्लोगल्ली फिरून मतांचा जोगवा मागितला. तर एकनाथ शिंदे यांनीही अनेक प्रचार सभा आणि फेऱ्या प्रचारार्थ मारल्या. परिणामी या दोनच पक्षांमध्ये थेट लढत असल्याचे दिसून आले. त्याचा थेट फटका राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इतर पक्षांना बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहापूर नगरपंचायतीत पूर्वी किमान तीन नगरसेवक होते. मात्र आता पक्षाचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकलेला नाही. एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या मुरबाड तालुक्यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा चेहरा शोधूनही सापडत नाही. मात्र या जुन्या पक्षाची अशा प्रकारे वाताहत का झाली यावर चर्चा करणे गरजेचे आहे.

 मुरबाड तालुक्यात यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. गोटीराम पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला ताकद देणारा नेता होता. पूर्वीच्या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात त्यावेळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किसन कथोरे यांचे वर्चस्व होते. कालांतराने अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात उल्हासनगरचा भाग जोडून हा मतदारसंघ अनुसूचीत जातीसाठी आरक्षित झाला. त्यामुळे किसन कथोरे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघाकडे कूच केली. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद  अध्यक्ष आणि मग आमदार असा प्रवास करणाऱ्या किसन कथोरे यांच्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी अनेक कार्यकर्ते जोडले  गेले होते. कथोरे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायती, पंचायत  समिती, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा बँक अशा जवळपास सर्वच शासकीय संस्थांवर  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य निवडून जात होते. मात्र २०१४  नंतर हे चित्र  बदलू लागले. मे २०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यावेळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते कपिल पाटील यांनी भाजपात प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. यापूर्वी ही जागा कॉंग्रेस पक्षाकडे होती. त्यामुळे जिल्ह्यात आणि  विशेषत: ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढण्यास सुरूवात झाली. सहा महिन्यांतच ग्रामीण भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला दुसरा धक्का हा किसन कथोरे यांच्या रूपाने बसला. कथोरे यांनी एकनाथ खडसे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतरची निवडणूक त्यांनी सहजपणे जिंकली. यात कथोरे यांचा वैयक्तीक जनसंपर्क भाजपच्या पथ्यावर पडला.

सलग लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ताकद वाढणे भाजपच्या दृष्टीने फायदेशीर ठरले. कालांतराने मुरबाड नगरपंचायत भाजपने आपल्या ताब्यात घेतली. ग्रामपंचायत  निवडणुकांमध्येही भाजपने मोठी मुसंडी मारली. पंचायत समिती निवडणुकांमध्येह भाजप आपली विजयी घौडदौड कायम राखून होता. याच काळात जिल्हा  परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेनेही ग्रामीण भागात आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी पाऊल उचलली. जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेल्या विजयाच्या माध्यमातून स्थानिक राजकारणात बळ मिळवण्यासाठी शिवसेनेने मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा भाग  असलेल्या अंबरनाथ तालुक्यात जिल्हा  परिषदेचे अध्यक्षपद तर मुरबाड तालुक्यात उपाध्यक्ष पद दिले. यामुळे शिवसेनेलाही स्थानिक राजकारणात जागा वाढवण्यासाठी ताकद मिळाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून ऐनवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेले दौलत दरोडा शहापूर विधानसभेतून आमदार झाले. एकीकडे स्वत:ची  ताकद  वाढवण्यासाठी भाजप आणि शिवसेना स्थानिक पातळीवर विविध माध्यमातून प्रयत्न करत  असताना या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्ष काय करतात, हा प्रश्न आहे.

 पडझडीच्या  काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पक्षबांधणीसाठी काही प्रयत्न केले. मात्र पक्ष वाढवण्यापेक्षा स्वत:ला मोठे करण्यात रस असलेल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या हाती नेतृत्व दिल्याने त्याचा फटका पक्षाला बसला. विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेस्डा पक्षामध्ये स्थानिक नेतृत्वात अभाव दिसून येतो आहे. पाठीशी कार्यकर्ते नसलेले नेते पक्षात वाढल्याने नेत्यांचा तळागाळापर्यंत जनसंपर्क आणि बांधिलकी राहिलेली नाही. परिणामी एकापोठापाठ एक निवडणूक पक्ष गमावतो आहे. इतकेच नव्हे तर पक्षाचे मताधिक्यही कमी होते आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत  एकूण मतदानापैकी अवघे १६ टक्के  मत मिळवण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला यश आले होते. तर विजयी उमेदवारांनी मिळवलेल्या मतांची टक्केवारी ७४ टक्के होती. शहापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आमदार असला तरी तालुक्यातील राजकारणात त्यांचा खुप प्रभाव पडल्याचे जाणवत नाही. त्यात नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकीतही पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाही. अशा परिस्थितीत या जुन्या पक्षांची झालेली वाताहत स्पष्टपणे दिसून येते आहे. त्यामुळे येत्या मुरबाड विधानसभा मतदारसंघावरील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा निकाली निघण्याचीही शक्यता वाटू लागली आहे. येत्या काळात पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली नाही तर  त्याचे वाईट परिणाम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोसावे लागतील यात शंका नाही.