मुंबई : भिवंडी महापालिकेतील सत्तेची गणित सोडविण्यासाठी काँग्रेसकडून आता ‘धर्मनिरपेक्ष आघाडी’ची घोषणा करण्यात आली आहे. भिवंडी महापालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवली व सर्वाधिक ३० नगरसेवक विजयी झाले.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळूनही आणखी ४ नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजपच्या नारायण चौधरी यांच्या नेतृत्वात ९ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून त्यांनी भाजपच्या विचारांचा त्याग केला आहे. ते काँग्रेस प्रणीत धर्मनिरपेक्ष आघाडीत सामील झाले आहेत. भिवंडीचा महापौर आणि उपमहापौर या धर्मनिरपेक्ष आघाडीचा होईल, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
भिवंडीत महापालिकेत बहुमतासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) सोबत आल्यानंतरही चार नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजप आणि शिंदेसेनेसोबत जायचे नाही ही काँग्रेसची भूमिका होती आणि त्या भूमिकेशी काँग्रसने तडजोड केली नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. टिळक भवन येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांच्यासह पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी ही भूमिका मांडली.
भाजपाचा त्याग करून धर्मनिरपेक्ष आघाडीत येण्याचा निर्णय निर्णय घेतलेले नारायण चौधरी हे पूर्वी काँग्रेस पक्षातच होते. त्यांनी काही सहकाऱ्यांसह भाजपाचा विचार सोडून स्वतंत्र गट स्थापन केला आणि काँग्रेस प्रणीत आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २४ दिवसांत इतर समविचारी पक्षांशी चर्चा केली, आता कोंडी फुटली असून भिवंडीचा महापौर, उपमहापौर, स्थायी समिती याबाबतचा निर्णय घेण्यासाठी तातडीने निरीक्षक पाठवले जाणार आहेत. हे निरीक्षक सर्वांशी चर्चा करतील व त्यानंतर निर्णय घेतला जाईल. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेसचे ३०, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) १२ व भाजप सोडून आलेले नगरसेवक मिळून भिवंडीत सत्ता स्थापन केली जाईल, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
महापौर कोणाचा उद्या स्पष्ट होणार
नारायण चौधरी यांनीही महापौरपदासाठी अर्ज भरला आहे तर काँग्रेसकडून तारक मोमीन यांनीही अर्ज भरला आहे. नारायण चौधरी यांनी भाजप सोडलेली आहे. त्यामुळे महापौर कोण होणार हे उद्याच स्पष्ट होईल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. राष्ट्रवादीचे (शरद पवार) खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘धर्मनिरपेक्ष आघाडी’ (सेक्युलर फ्रंट) स्थापन करून सत्ता स्थापण्याचा प्रयत्न मागील २४ दिवसापासून सुरु होता, असे स्पष्ट केले.
समाजवादी पक्षाशी चर्चा केली पण त्यांनी शिंदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता भाजप सोडून काही नगरसेवक आघाडीत सहभागी झाल्याने सत्ता स्थानपनेचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगितले. धर्मनिरपेक्ष आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि समाजवादी पक्ष असे तीन पक्ष होते.
मात्र मागचे २५ दिवस काँग्रेस ३० आणि राष्ट्रवादी १२ असे ४२ चे संख्याबळ आमच्याकडे होते. ९ फेब्रुवारीला मी आवाहन केले होते की आघाडीत समाजवादीने यावे महापौर काँग्रेसचा आणि उपमहापौर राष्ट्रवादीचा असेल.
जर समाजवादी पक्ष आला तर त्यांना चार पावले मागे जाऊन आम्ही त्यांना उपमहापौरपद द्यायला तयार आहोत. विलास पाटील आले तर त्यांनाही हे पद द्यायला तयार होतो, पण कुणीही आले नाही. आता आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे गट स्थापन केला किंवा काय हे उद्या समजेल असे बाळ्या मामा म्हणाले.

