बदलापूर: एकीकडे जिल्ह्यातील वनसंपदा वणवे पेटण्याच्या घटनांमुळे नामशेष होत असताना दुसरीकडे वणवा प्रतिबंधक पद्धतीचा वापर करून समृद्ध जंगलांपासून वणवे दूर ठेवण्याचा प्रयोग ठाणे आणि रायगड जिल्ह्यात यशस्वी झाला आहे. यात माथेरानचा डोंगर, अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ, कल्याण तालुक्यातील वरप येथील टेकडी आणि मध्य रेल्वेच्या आसनगाव आणि कसारा रेल्वेमार्ग लगतच्या भागाचा समावेश आहे. सगुणा वनसंवर्धन तंत्राचा या चारही ठिकाणी वापर करण्यात आला होता.
जिल्ह्यात ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांतील डोंगरांवर नुकतीच वणव्यांची मालिका दिसली. पक्षी, प्राण्यांचे खाद्य आणि पाणी संपल्याने त्याचा जीवसृष्टीवरही परिणाम झाला. या वणव्यांना रोखण्यासाठी वन विभागही तितकाचा सक्षम नसल्याचेच या काळात दिसून आले. त्याच वेळी मानवरहित वणवा प्रतिबंध करण्यासाठी अवलंबण्यात आलेले तंत्र यशस्वी ठरल्याचे समोर आले आहे. चार वर्षांपूर्वी नेरळजवळच्या माथेरानच्या डोंगरावर सगुणा वनसंवर्धन तंत्राचा वापर करण्यात आला होता. वन विभागाचे क्षेत्र तेव्हापासून वणव्यांपासून मुक्त झाले आहे. गेल्या महिन्यात माथेरानच्या खासगी डोंगराला वणव्याने वेढले असताना माथेरानचे वनक्षेत्र मात्र वणव्यापासून वाचले. हे तंत्र वणवा रोखण्यात उपयुक्त ठरत असल्याचे लक्षात आल्याने वन विभागाच्या मदतीने कल्याण तालुक्यातील वरप येथे तंत्र वापरण्यात आले.
अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथेही हे तंत्र वापरण्यात आले. त्यामुळे वणवे वाचविण्यासाठी या तंत्राचा अधिक वापर करावा यासाठी आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे, अशी माहिती ठाण्याचे सहायक वन संरक्षक तुळशीराम हिरवे यांनी दिली आहे.
रेल्वेमार्गही सुरक्षित
रेल्वे मार्गाशेजारच्या भागात लागलेल्या वणव्याचा फटका रेल्वेसेवेला बसत असल्याने गेल्या वर्षांत रेल्वे प्रशासनाने या तंत्राची पाहणी करून मध्य रेल्वेच्या आसनगाव ते कसारा या पट्टय़ात हे तंत्र वापरले. यंदाच्या वर्षांत वणवे लागले तरी त्याची झळ रेल्वेमार्गापर्यंत आली नाही. या ३० किलोमीटर परिसरात रेल्वे मार्गालगत यंदा वन संवर्धन तंत्र सगुणा रुरल फाऊंडेशनच्या सहकार्याने राबवल्याने यंदा वणव्याच्या झळा रेल्वे मार्गापर्यंत आल्या नाहीत. तर रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची एकही घटना घडली नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे अधिकारी सुरेश पाखरे यांनी दिली आहे.
तंत्र असे..
डोंगरावर वाढणाऱ्या गवतावर तणनाशकाने एक मीटरची जाळरेषा मारली जाते. संपूर्ण डोंगरावर जाळरेषा आखल्यास वणवा खंडित होतो. त्यामुळे तेथील गवत, झाडेझुडपे आणि लहान-मोठय़ा जलस्रोतांना संरक्षण मिळते. वणव्याला रोखण्यासाठी अनेक वनस्पतींची विविध टप्प्यांवर लागवड केली जाते.
माथेराननंतर अंबरनाथ, कल्याण आणि रेल्वे रुळाशेजारी आम्ही केलेले चारही प्रयोग यशस्वी झाले आहेत. सगुणा वनसंर्धन तंत्राची वणवे रोखण्याची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. या तंत्रामुळे वनसंपदेसोबत डोंगरावरील जलस्रोतांचेही संवर्धन झाले आहे.-चंद्रशेखर भडसावळे, कृषितज्ज्ञ, सगुणा रुरल फाऊंडेशन



