डोंबिवली – डोंबिवलीपासून आठ किलोमीटर अंतरावरील शिरढोण गाव हद्दीत म्हाडाचा समुह गृहप्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजता निर्माणाधिन इमारतीला बसविलेल्या क्रेन मास्टची उंची एका कामगार वाढवित होता. यावेळी अति उच्च ताणाचा क्रेनचा सिलिंंग हुक कामगाराच्या हातामधून सटकल्याने त्याचा फटका कामगाराच्या कपाळाला बसून तो गंभीर जखमी झाला. मंगळवारी संध्याकाळी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

विजयनाथ रामबहादुर कुशवाहा (४०) असे मृत कामगाराचे नाव आहे. ते शिरढोण येथील कामगार वसाहतीत राहत होते. ते मुळचे उत्तरप्रदेशातील देवरीया जिल्ह्यातील चौरडीहा गावचे रहिवासी होते. व्यवसायानिमित्त ते डोंबिवली परिसरात राहत होते. या अपघाताची तक्रार क्रेन तंत्रज्ञ अरविंद गौतम (१९) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी संध्याकाळी केली.

मानपाडा पोलीस ठाण्यातील माहिती अशी, की डोंबिवलीपासून आठ किलोमीटर अंतरावर म्हाडाचा गृहप्रकल्प सुरू आहे. याठिकाणी विविध प्रकारची तांत्रिक यंत्रणा बांधकामासाठी कार्यरत आहे. या यंत्रणेवर काम करणारा मजूर वर्ग याच भागात कामगार वसाहतीत राहतो.

सोमवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या दरम्यान म्हाडा प्रकल्पाच्या १६ ब या इमारतीला लावलेल्या क्रेनची उंची वाढविण्याचे काम तक्रारदार क्रेन तंत्रज्ञ अरविंद गौतम आणि कामगार विजयनाथ कुशवाहा करत होते. क्रेनला असलेला पट्टा ताणून तो क्रेनच्या हुकमध्ये अडकवून मग क्रेनची उंची वाढविण्याचे काम सुरू असताना, अचानक क्रेनचा ताणलेला पट्टा हुकात न बसता अति ताणामुळे कामगार विजयनाथ कुशवाहा यांच्या हातामधून सटकला. आणि त्याचा जोराने फटका विजयनाथ यांच्या कपाळाला बसला.

विजयनाथ यांच्या कपाळाला जोराचा फटका बसल्याने कपाळातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. ते अत्यवस्थ होते. त्यांना तातडीने पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. तेथे तपासणी केल्यावर डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव शिंदे यांच्या आदेशावरून साहाय्यक पोलीस निरीक्षक के. आर. पाटील आणि पथकाने घटनास्थळी भेट दिली. या अपघात प्रकरणाची मानपाडा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. गेल्या वर्षभरात कल्याण, डोंबिवलीत निर्माणाधिन इमारतींवर काम करताना चार ते पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.