लोकसत्ता विशेष प्रतिनिधी ठाणे : येथील लक्ष्मी-चिरागनगर भागातील शेठ झुरी या बांधकाम प्रकल्पात सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दोन वर्षांची मुदत उलटूनही बिल्डरने सदनिकांचा ताबा दिलेला नाही. यामुळे आक्रमक झालेल्या ग्राहकांनी शनिवारी बांधकाम प्रकल्प कार्यालयात एकत्रित येऊन बिल्डरविरोधात घोषणाबाजी करत महारेरा कायद्यानुसार दिरंगाई भरपाई देण्याबरोबरच सदनिकांचा ताबा तातडीने देण्याची मागणी केली. दरम्यान, ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयात मंगळवारी रहिवाशी आणि विकासक यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. ठाणे येथील लक्ष्मी-चिरागनगर परिसरात शेठ झुरी या नावाचा बांधकाम प्रकल्प सुरू आहे. शेठ बिल्डर्समार्फत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पात तीन टाॅवर उभारण्यात येणार असून यातील एक टाॅवर उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पाच्या कार्यालयात शनिवारी अनेक ग्राहक जमले होते. बिल्डरकडून सदनिकांचा ताबा देण्यासाठी वारंवार नवीन तारखा देऊन फसवणुक केली जात असल्याचा आरोप करत ग्राहकांनी बिल्डर विरोधात घोषणाबाजी केली. तसेच बिल्डरकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ग्राहकांनी तिथेच ठिय्या मांडला. आणखी वाचा-कल्याणमधील खडेगोळवली येथील विठ्ठल मंदिरात चोरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असल्यामुळे त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत होती. याबाबत माहिती मिळताच स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी त्याठिकाणी जाऊन ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि या संदर्भात ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा करून एक बैठक आयोजित केली. या बैठकीला ग्राहकांबरोबरच बिल्डर उपस्थित राहणार आहेत. या वृत्तास आमदार सरनाईक यांनी दुजोरा देत ग्राहकांना न्याय मिळवा, या उद्देशातून ही बैठक आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांचे म्हणणे २०१६ मध्ये या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली. तीन वर्षात प्रकल्पाचे काम पुर्ण होणार असल्याचा दावा बिल्डरने केला होता. परंतु २०१७ मध्ये महारेरा कायद्यांतर्गत प्रकल्पाची नोंदणी करताना बिल्डरने २०२२ मध्ये प्रकल्पाचे काम पुर्ण होणार असल्याची नोंद केली. तसेच बिल्डरने सदनिकेसाठी ग्राहकांकडून टप्प्याटप्प्याने पैसे घेतले आणि ते देण्यास उशीर झाल्यावर व्याजही वसुल केले आहे. अनेकांनी सेवानिवृत्तीचे पैसे सदनिका घेण्यासाठी भरले आहेत. अनेकजण भाड्याच्या खोलीत राहत आहेत. काहीजणांनी सदनिकांचे पुर्ण पैसे दिले आहेत. तरीही त्यांना घराचा ताबा मिळत नाही. सदनिकांचा ताबा मिळण्यास पालिकेमुळे उशीर होत असल्याचा दावा बिल्डरकडून करण्यात येतो. तसेच दोन वर्षांची मुदत उलटूनही आम्हाला अजूनही सदनिकांचा ताबा देण्यासाठी तारीखच दिली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी यावेळी केला. आणखी वाचा-डोंबिवलीत पूर्ववैमनस्यातून रिक्षा चालकाची हत्या बिल्डरचं म्हणणं काय? एक संस्था म्हणून अश्विन शेठ ग्रुप नेहमीच ग्राहक केंद्रित राहिलेला आहे. हा समूह 3८ वर्षांपासून अस्तित्वात आहे. आम्ही संपूर्ण मुंबईत ८० हून अधिक प्रकल्प उभारून सदनिका वितरित केल्या आहेत आणि घरे वितरीत करण्यावर भर असल्याचा आम्हाला अभिमान आहे. ठाण्याच्या प्राइम प्लॅटिनम पट्ट्यातील शेठ झुरी या आमच्या प्रकल्पाला आमच्या नियंत्रणाबाहेरील काही कारणांमुळे विलंब झाला. प्रकल्प सुरू झाला तेव्हा या समस्यांचा विचारही करता येण्यासारखा नव्हता. त्या समस्या म्हणजे, कोरोनाची महामारी, नियमांमधील बदल, फ्लेमिंगोशी संबंधित आरक्षण. दर आठवड्याला समोरासमोर बैठका घेणे आणि संयमाने आमच्या ग्राहकांच्या तक्रारी ऐकणे आणि त्यांचे निराकरण करणे यासह नियमितपणे प्रकल्पाच्या स्थितीबद्दल माहिती देणे यासाठी सर्व ग्राहकांच्या आम्ही सतत संपर्कात आहोत. विलंबाची कारणे पूर्णपणे आमच्या नियंत्रणात नसतानाही आमच्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही आमच्या सर्व ग्राहकांपर्यंत एका पत्राद्वारे एक उपाय दिला आहे. ग्राहकांना त्यांचे बुकिंग रद्द करण्याचा पर्याय दिला. त्यापोटी आम्ही परतावा देतो किंवा ग्राहकांना आजूबाजूच्या आमच्या प्रकल्पाचा पर्याय निवड करण्याचा उपाय निवडू शकतात. हा उपाय अनेक ग्राहकांनी स्वीकारला आणि ज्यांनी प्रकल्पासोबत राहणे पसंत केले, त्यांना हे चांगले ठाऊक होते की विलंब होऊ शकतो आणि तो आमच्या नियंत्रणाबाहेर असेल. शिवाय, आम्ही आधीच ३० ग्राहकांना त्यांच्या इंटिरिअरच्या कामांसाठी चाव्या दिल्या आहेत. ग्राहकांशी नुकत्याच झालेल्या समन्वयानुसार आम्ही त्यांना कळवले आहे की, आम्ही टॉवर C आणि D साठी OC मिळवण्यासाठी आणि डिसेंबर २०२४ पर्यंत फ्लॅट्स हस्तांतरित करण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहोत. ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी आम्ही नेहमीच द्वार खुले ठेवलेले आहे. कंपनी म्हणून आमचा हेतू नेहमीच लवकरात लवकर प्रकल्प वितरित करण्याचा राहिला आहे आणि आम्ही ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,असे शेठ ग्रुप प्रशासनाकडून सांगण्यात आले.