ठाणे: येथील कॅडबरी जंक्शन उड्डाणपुला जवळ रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका कंटेनरचा अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून ठाणे जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु, या अपघातामुळे मुंबई – नाशिक महामार्गावरील वाहुतक संथ गतीने सुरु होती.
कामता पाल (५०) असे अपघातात जखमी झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. कामता पाल हा रविवारी कळंबोलीहून गुजरात कडे प्रवास करत होता. सकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याचे कंटेनर वाहन मुंबई- नाशिक महामार्गावरील कॅडबरी जंक्शन जवळील उड्डाणपूल उतरणीला आले असता त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान, कंटेनरची धडक रस्त्यावरील दुभाजकाला बसून अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळतातच घटनास्थळी राबोडी पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी ०२ हायड्रा मशीनसह, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१ अग्निशमन वाहनासह दाखल झाले.
कंटेनर चालक कामता पाल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, अपघातग्रस्त कंटेनर ०२ हायड्रा मशीनच्या साहाय्याने वाहतूक पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक २ तास धिम्या गतीने सुरू होती, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
