दूषित पाणी असल्याने पुरवठा बंद करण्याचा ठराव पालिका प्रशासनाकडून मोडीत

सुहास बिऱ्हाडे, वसई

विरार पूर्वेला असलेल्या पापडखिंड धरणाचे पाणी दूषित झाल्याने या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येऊ नये, असा ठराव वर्षभरापूर्वी वसई-विरार महापालिकेने केला होता. मात्र हा ठराव महापालिकेनेच मोडला असल्याचे दिसून येत आहे. विरारमधील फुलपाडा परिसराला अजूनही याच धरणातून पाणीपुरवठा होत आहे. या धरणातील तीन पंपांपैकी दोन पंप नादुरुस्त झाल्याने नागरिकांना हे पाणीही अनियमित मिळत आहे.

वसई-विरार शहरात सूर्या पाणी प्रकल्पाबरोबरच उसगाव, पेल्हार आणि पापडखिंड धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. विरार शहराला फुलपाडा येथील पापडखिंड धरणातून १ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज केला जात होता. सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा टप्पा क्रमांक २ मंजूर झाल्यानंतर शहरात अतिरिक्त शंभर दशलक्ष लिटर पाणीपुरवठा व्हायला सुरुवात झाली. या योजनेनंतर शहरात मुबलक पाणी आले आणि पाण्याचा प्रश्न मिटला होता. मात्र विरार पूर्वेच्या पापडखिंड धरणातून फुलपाडा परिसरात १ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत होता. या धरणाला कुठलीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने पर्यटकांकडून कचरा टाकला जात असल्याने धरणातील पाणी अस्वच्छ झाले होते. या धरणात विरोध झुगारून दरवर्षी छटपूजा होते. त्यामुळे धरणाचे पाणी प्रदूषित झालेले आहे. याशिवाय या धरणातून अनेकदा कुजलेले मृतदेह सापडले आहेत. पालिकेचे तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी हे प्रकार उघडकीस आणल्यानंतर धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरू नये, असे आदेश दिले होते.

मात्र आदेश झुगारून पापडखिंड धरणातून आजही दररोज १ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विरारच्या फुलपाडा परिसराला होत आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे. या धरणातून तीन पंपांद्वारे पाणी काढून पुरवले जाते. पाच महिन्यांपूर्वी यातील एक पंप नादुरुस्त झाला होता, तर आता दुसरा पंपही बंद पडलेला आहे. एकाच पंपातून हे पाणी पुरवले जाते. त्यामुळे नागरिकांना आता हे पाणी मिळणेही दुरापास्त झालेले आहे. मुळात हे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे. या पाण्याऐवजी सूर्या प्रकल्पाचे पाणी या परिसराला देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. मात्र पालिका त्याकडे दुर्लक्ष करते, असा आरोप येथील नगरसेवक सुदेश चौधरी यांनी केला आहे. ठेकेदार पंपाची देखभाल दुरुस्ती करत नाही. त्यामुळे नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही. या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून या धरणाचे पाणी पिण्यासाठी कायमस्वरूपी बंद करावे, अशी मागणीही त्यांनी पालिकेकडे केली आहे.

अखेर ‘वॉटर पार्क’चा निर्णय मागे

१९८२ मध्ये तत्कालीन राज्यमंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी हे धरण मंजूर करवून घेतले होते. विरार पूर्वची लोकसंख्या त्या वेळी १५ हजार होती. शहरात अतिरिक्त पाणी आल्यानंतर पालिकेने हे धरण बंद करून या ठिकाणी वॉटर पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. ‘एका धरणाचा मृत्यू’ या शीर्षकाखाली ‘लोकसत्ता’ने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर जनक्षोभ उसळला आणि पालिकेला हा निर्णय स्थगित करावा लागला होता. पालिका या धरणाला सुरक्षा व्यवस्था देण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे पर्यटकांकडून धरण अस्वच्छ केले जाते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

जे पंप नादुरुस्त झाले होते, ते पंप दुरुस्त करण्यात आले आहेत. नवीन पंप बसवण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. तसेच या भागाला सूर्या धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी पायाभूत बदल करावे लागणार आहेत. या परिसरात जलकुंभ उभारून तसचे नवीन जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. त्यानंतरच सूर्या प्रकल्पाचा पाणीपुरवठा करणे शक्य होईल.

– माधव जवादे, शहर अभियंता, वसई-विरार महापालिका