सततच्या जलवाहिन्या फुटीमुळे डोंबिवली एमआयडीसीत दूषित पाण्याचा पुरवठा | Contaminated water supply in Dombivli MIDC due to continuous bursting of water pipes amy 95 | Loksatta

सततच्या जलवाहिन्या फुटीमुळे डोंबिवली एमआयडीसीत दूषित पाण्याचा पुरवठा

डोंबिवली एमआयडीसीत रस्ते काँक्रिटीकरणाची कामे करण्यासाठी जेसीबाचा वापर केला जात आहे.

dombiwali
(एमआयडीसीतील मिलापनगर भागात जेसीबीने रस्ते खोदकाम करताना फुटलेली जलवाहिनी आणि रस्त्यावर पसरलेले पाणी.)

डोंबिवली एमआयडीसीत रस्ते काँक्रिटीकरणाची कामे करण्यासाठी जेसीबाचा वापर केला जात आहे. जेसीबी चालक आणि रस्ते पर्यवेक्षकाकडून रस्ते खोदकाम करताना नियोजशून्य पध्दतीने खोदकाम केले जात असल्याने एमआयडीसीतील मिलापनगर, टिळकनगर शाळा, सिस्टर निवेदिता शाळा, सुदर्शनगर परिसरातील जलवाहिन्या गेल्या पंधरा दिवसात पाच वेळा फुटल्याने या भागातील रहिवाशांना दुर्गंधीयुक्त पाणी आणि पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

हेही वाचा >>>उल्हासनगरः प्रदुषणामुळे उल्हास नदीत पुन्हा जलपर्णी;जलपर्णीची वेगाने वाढ, पाणी उचल केंद्रांना धोका

दर दोन दिवसांनी जेसीबीच्या घावांनी रस्त्याखाली वाहिन्या फुटल्या जात आहेत. त्यामुळे हजारो लीटर पाणी फुकट जात आहे. रस्त्याखाली आणि बाजुला महावितरणच्या वीज वाहिन्या, पाण्याच्या जलवाहिन्या आहेत. हे माहिती असुनही जेसीबी चालकाकडून आक्रमकपणे जेसीबी फावड्याचा वापर केला जाऊन जमिनीखालील जलवाहिन्या फोडल्या जात आहेत. मागील १५ दिवसात आर. आर. रुग्णालय ते मिलापनगर, सुदर्शननगर, ओंकार शाळा परिसर, टिळकनगर शाळा, सिस्टर निवेदिता शाळा परिसरातील जलवाहिन्या जेसीबीच्या फावड्यामुळे पाच वेळा फुटल्या आहेत. फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त केल्या जात आहेत. परंतु, या जलवाहिन्यांमधून घरोघरी होणाऱ्या पाणी पुरवठ्यात दुर्गंधी येते, अशा तक्रारी रहिवाशांकडून केल्या जात आहेत.

हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यात वर्षभरात २ कोटी ७२ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

काही अपाय होऊ नये म्हणून एमआयडीसीतील अनेक रहिवासी बाजारातून पाण्याचे बाटले विकत आणत आहेत. काही रहिवासी खासगी टँकरला दोन ते तीन हजार रुपये मोजून सोसायटीत पाणी आणून त्याचे वितरण करत आहेत. दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन अपाय झाला तर त्याची जबाबदारी रस्ते ठेकेदार घेईल का असे प्रश्न नागरिक करत आहेत. या रस्ते कामावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने घाईत घाईत रस्ते कामे उरकायची धरल्याने जेसीबी चालक आणि त्याच्यावरील नियंत्रक नियमबाह्यपणे काम करुन जलवाहिन्या फोडणे, महावितरणाच्या व इतर सेवेच्या वाहिन्या फोडत आहेत, अशा तक्रारी रहिवासी करत आहे.

याविषयी ठेकेदाराला सांगितले तर जेसीबीमुळे असे प्रकार होत आहेत. आम्ही तात्काळ वाहिनी दुरुस्त करुन दिली ना, अशी उत्तरे दिली जात आहेत. अनेक घरांचा वीज पुरवठा महावितरणच्या विज वाहिनीला धक्का लागला की बंद पडत आहे. पालिकेतर्फे शहराच्या विविध भागात काँक्रिटीकरणाची कामे केली जात आहेत. परंतु, असा प्रकार शहरात कोठेही होत नाही. मग तो एमआयडीसीत सतत का सुरू आहे याची चौकशी करण्याची मागणी रहिवाशी करत आहेत.

हेही वाचा >>>ठाणे: शेतकऱ्यांना मिळतोय ‘ सिंचन विहिरीचा ‘ आधार; सिंचन विहिरींच्या उभारणीकरिता जिल्ह्यात ४ कोटींचे आर्थिक सहाय्य

रस्ते ठेकेदाराला राजकीय आशीर्वाद असल्याने तो कोणाचेही काही ऐकत नाही. मनमानी करुन रस्ते कामे केली जात असल्याने स्थानिक आमदार प्रमोद पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून ठेकेदाराला योग्य तंबी देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

“आर. आर. रुग्णालय ते एम्स रुग्णालय वळण रस्त्यापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. ही कामे करताना जमिनीखाली जलवाहिनी, इतर सेवा वाहिन्या आहेत याचे भान न ठेवता जेसीबीने खोदकाम केले जात आहे. त्यामुळे या भागातील जलवाहिन्या सतत फुटून पाणी फुकट जाते. नागरिकांना पाणी टंचाई आणि दूषित पाण्याला सामोरे जावे लागत आहे.“-कौस्तुभ संत,रहिवासी, एमआयडीसी

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 19:00 IST
Next Story
उल्हासनगरः प्रदुषणामुळे उल्हास नदीत पुन्हा जलपर्णी;जलपर्णीची वेगाने वाढ, पाणी उचल केंद्रांना धोका