ठाणे : कोपरी रेल्वे स्थानकाजवळील सर्वाधिक वर्दळीचा परिसर असलेल्या अष्टविनायक चौकातील मुळ रस्ता आणि त्याची केलेली दुरुस्ती ही दोन्ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी एआयसी कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचे आणि या काळात ठाणे महापालिकेच्या इतर कोणत्याही निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध घालण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच या कामाची पर्यवेक्षणीय जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईच्या निमित्ताने रस्त्याच्या कामात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी एकप्रकारे दिला आहे.

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे हे अभियान महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रस्ते, सुशोभिकरण तसेच इतर प्रकल्पांची कामे सुरू आहेत. रस्ते कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून ६०५ कोटी रुपयांचा निधी ठाणे महापालिकेला देऊ केला आहे. ठाणेकरांना चांगले, दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत आणि ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे करण्यात येत आहेत. परंतु, काही रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून, या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने रस्त्यांच्या कामाचे निरीक्षण सुरू केले आहे. आयुक्त अभिजीत बांगर हे अचानक भेटी देऊन कामांची पाहणी करीत आहेत. रस्त्याच्या कामांच्या तांत्रिक दर्जाबाबत तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन त्यानुसार कारवाई करण्यात येईल आणि प्रत्येक खड्ड्यापाठी (प्रती एक चौरस मीटर) एक लाख रुपयांचा दंड आकारला जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त बांगर यांनी यापूर्वीच दिला होता.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
High Court
अपंगांसाठीचे कायदे पुस्तकापुरते मर्यादित ठेवू नका, दृष्टीहीन महिलेला रेल्वेतील नोकरीबाबत दिलासा देताना उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
The High Court reprimanded the government to be sensitive to the demand for the house of the eyewitnesses of the 26 11 attacks Mumbai news
२६/११ हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीच्या घराच्या मागणीबाबत संवेदनशीलता दाखवा; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

हेही वाचा – पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणारी टोळी अटकेत

ठाणे पूर्वेकडील (कोपरी) येथील अष्टविनायक चौकात गेले काही महिने रस्त्याचे काम सुरू होते. स्थानिक नागरिकांचे या कामाकडे बारीक लक्ष होते. रस्त्याचे काम कमी दर्जाचे होत असल्याची बाब एका स्थानिक नागरिकाने महापालिका आयुक्त बांगर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच कामाचा दर्जाही खराब असल्याची तक्रार त्या नागरिकाने केली होती. त्याची दखल घेऊन आयुक्त बांगर यांनी संबंधित कामाची जबाबदारी असलेल्या कार्यकारी अभियंत्याला रस्ते कामाची पाहणी करण्यास सांगितले. त्यावर, कंत्राटदाराने न सांगताच हे काम केले आहे. शिवाय त्याची आता दुरुस्तीही केली आहे, असा अहवाल कार्यकारी अभियंत्याने सादर केला. मात्र, तक्रारदाराने त्याचा पाठपुरावा कायम ठेवला. कामाच्या दर्जाबाबत त्याचे म्हणणे कायम राहिल्याने, आयुक्त बांगर यांनी अष्टविनायक चौक येथील रस्त्याच्या कामाला अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान रस्त्याचे काम योग्य दर्जाचे नसल्याची बाब त्यांच्याही निर्दशनास आली. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी आयुक्तांची भेट घेऊन कामाच्या दर्जाबद्दल त्यांना वाटणारी चिंता व्यक्त केली. तसेच, अनेकदा तक्रारी करूनही संबंधितांनी त्यात लक्ष न घातल्याची खंतही व्यक्त केली.

हेही वाचा – ठाणे : बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात, १७३ परीक्षा केंद्रांवर १ लाख ४ हजार ५६१ विद्यार्थी देणार परीक्षा

रस्ते काम खराब असल्याचे ठेकेदाराने केले मान्य

या रस्त्याचे काम मास्टिक प्रकारचे असून या कामात डांबराचे तापमान योग्य न राखल्यास रस्त्याचा पृष्ठभाग लवकर उखडतो. परंतु, तांत्रिकदृष्ट्या योग्य काम झाल्यास किमान दहा वर्षे हा रस्ता खड्डेमुक्त राहू शकेल, अशी खात्री दिली जाते. अष्टविनायक चौकातील मूळ रस्ता खराब झालाच, शिवाय त्याची दुरुस्तीही नीट झाली नाही. याची दखल घेत, त्या कंत्राटदाराला खुलासा करण्याचे आदेश आयुक्त बांगर यांनी दिले. कंत्राटदाराने असमाधानकारक खुलासा केला. त्यामुळे त्याला काळ्या यादीत का टाकू नये, अशी नोटीस बजावण्यात आली. या नोटिशीच्या उत्तरात त्याने मूळ काम आणि त्याची दुरुस्ती खराब असल्याचे मान्य केले. त्यामुळे, एकंदर हे काम करताना कंत्राटदाराचा हेतू प्रामाणिक नसल्याच्या निष्कर्षाप्रत महापालिका प्रशासन आले. नागरिकांनी तक्रार केली नसती तर रस्त्याची दुरुस्तीही झाली नसती. या पार्श्वभूमीवर, कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकणे, तसेच, ठाणे महापालिकेच्या इतर निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यापासून प्रतिबंध घालण्याचे आदेश आयुक्त बांगर यांनी दिले. संबंधित कामाच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.