ठाणे : ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले आणि त्यांचे पती राजू फाटक हे भर रस्त्यात एकमेकांना भिडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याची चित्रफीत समाजमाध्यांवर प्रसारित झाली असून यामुळे या नगरसेवकांमधील गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला अंतर्गत वाद उफाळून आल्याचे दिसून येत आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून विकास रेपाळे हे ओळखले जातात, तर राजू फाटक हे शिवसेना आमदार रवी फाटक यांचे बंधू आहेत. राजू फाटक यांच्या पत्नी नम्रता या माजी नगरसेविका आहेत. विकास रेपाळे आणि नम्रता फाटक यांचा प्रभाग एकमेकांना लागूनच आहे. यातूनच त्यांच्या विकासकामांवरून गेल्या काही वर्षांपासून अंतर्गत वाद सुरू आहे.
तीन दिवसांपूर्वी त्यांच्यातील वाद इतका टोकाला गेला की, तो हाणामारीपर्यंत पोहोचला होता. रहेजा येथील मेट्रोच्या उड्डाणपुलाखाली शहर सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून या कामावरूनच हा वाद झाला आहे. या वादातून त्यांनी भर रस्त्यात एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यात झटापटही झाली. या वादाची चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे. या चित्रफितीवरून शहरात वेगवेगळय़ा प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्याचबरोबर याच मुद्दय़ावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधत टीका केली आहे. या संदर्भात नम्रता फाटक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
काय आहे वाद
रहेजा येथील मेट्रोच्या उड्डाणपुलाखाली शहर सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी वृक्ष लागवड तसेच सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत. विकास रेपाळे यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे करण्यात येत आहेत, तर याच जागेवर खुली व्यायामशाळा उभारण्यात येत आहे. या कामासाठी नम्रता फाटक यांनी पाठपुरावा केला होता. सौंदर्यीकरणाच्या कामात व्यायामशाळा बाधित होऊन निधी वाया जाण्याची शक्यता असल्यामुळे रेपाळे यांनी हे काम करू नका, असे सांगितले. यावरून नम्रता फाटक या संतापल्या आणि त्यांनी रेपाळे यांना जाब विचारला. यावरून त्यांच्यात वाद झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सौंदर्यीकरणाचे काम सुरू केले होते. याच भागात ५० मीटर अंतरावर खुली व्यायामशाळा असतानाही सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या जागेवर खुली व्यायामशाळा बांधली जात होती. सौंदर्यीकरणाच्या कामात ही व्यायामशाळा बाधित होऊन खर्च वाया गेला असता. त्यामुळे त्यांना व्यायामशाळा बांधू नका, असे सांगितले. त्यावरून त्यांनी शिवीगाळ केल्याने हा वाद झाला. – विकास रेपाळे, माजी नगरसेवक, शिवसेना

वार-प्रतिवार, कोथळे, वाघनखं, राडा हे शब्द शिवसेना पक्षप्रमुख सातत्याने वापरतात, त्यामुळे हा आदेश शिरसावंद्य मानत ठाण्यात दोन लोकप्रतिनिधींनी भर रस्त्यात टक्केवारीच्या भांडणामधून अर्वाच्य शिव्या देत एकमेकांना भिडत मारामाऱ्या केल्या. सत्तेने शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमधला राक्षस डोकं वर काढू लागला आहे. त्याला आत्ताच थांबवायला हवे अन्यथा हा सामान्य माणसाला पण जेरीस आणेल. – सुजय पतकी, उपाध्यक्ष, भाजप ठाणे</strong>