खाऊखुशाल
आर्तीज किचन टेस्ट ऑफ गुजरात
रूम नं. ३, लक्ष्मी बिल्डिंग, नारायणवाडी, शिवाजी चौक, कल्याण (प.)
वेळ : सकाळी ९.३०
ते रात्री १०.३०.

आजच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांपासून ते खाद्यपदार्थापर्यंत सर्व गोष्टींत फ्यूजन झाल्याचे पाहायला मिळत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात शास्त्रीय संगीतातील काही पारंपरिक संगीत प्रकारांचे पाश्चिमात्य संगीताबरोबर झालेले फ्यूजन, हिंदुस्थानी संगीतातील पारंपरिक वाद्यांचे पाश्चिमात्य वाद्यांबरोबर झालेले फ्यूजन संगीत मैफलींमध्ये पाहायला मिळत आहे. सर्वत्र होत चाललेल्या फ्यूजन प्रकारांमध्ये खाद्यपदार्थही मागे कसे राहतील बरे!
दाक्षिणात्य पदार्थाचे गुजराती फ्यूजन असलेला पांढरा ढोकळा या खाद्यपदार्थाच्या फ्यूजनचा उत्तम नमुना म्हणता येईल. कल्याणमधील ‘आर्तीज किचन टेस्ट ऑफ गुजरात’ येथे मिळणारा पांढरा ढोकळा हा खवय्यांच्या विशेष पसंतीचा आहे. आर्तीज किचन येथे गुजराती पद्धतीचे कोरडे खाद्यपदार्थ आणि गरमागरम/ताजे खाद्यपदार्थ मिळतात. गरमागरम खाद्यपदार्थाच्या यादीत असलेल्या पांढऱ्या ढोकळ्याचे विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत. यामध्ये पांढरा ढोकळा, स्टफ चीझ गार्लिक ढोकळा, पनीर भूर्जी ढोकळा, मसाला कॉर्न ढोकळा, ग्रीन ढोकळा आदी ढोकळ्यांचा समावेश आहे. पांढरा ढोकळा हा तांदूळ, उडीद डाळ, ताक, मिरची, आले, मीठ आदी घटकांच्या मिश्रणातून तयार होतो. हा ढोकळा चवीला आंबट आणि तिखट लागतो. वितळलेले चीझ आणि लसूण या घटकांच्या सान्निध्यात पांढऱ्या ढोकळ्याची खाद्यचव फुलविणारा स्टफ चीझ गार्लिक ढोकळाही येथे मिळतो. हा ढोकळा चवीला मध्यम तिखट लागतो. त्याचप्रमाणे पनीर, कांदा, टॉमेटो, आले, कोथिंबीर, मीठ यांच्या मिश्रणातून तयार झालेला पनीर भूर्जी ढोकळाही येथे मिळतो. मका, टॉमेटो प्यूरी, कांदा, आले, गरम मसाला, मीठ यांच्या मिश्रणातून तयार झालेला झणझणीत चवीचा मसाला कॉर्न ढोकळाही मिळतो. त्याचप्रमाणे कोंथिबीर, पालक, पुदिना यांच्या मिश्रणातून तयार झालेला हिरवागार ग्रीन ढोकळाही येथे उपलब्ध आहे. हिरवा रंग धारण केलेला हा ढोकळा चवीला मात्र थोडासा तिखट आहे. सर्व प्रकारच्या पांढऱ्या ढोकळ्याबरोबर कोंथिबीर आणि मिरची यांच्या मिश्रणातून तयार झालेली हिरवीगार चटणी देण्यात येते.
पांढरा ढोकळा खाल्ल्यानंतर आपसूकपणे खवय्यांना लागणारी तहान भागविण्यासाठी येथे खास प्रकारचे लाल पेरू सरबतही उपलब्ध आहे. लाल पेरू, घरगुती मसाले (काळी मिरी, लाल मिरची, मीठ, साखर) आणि शुद्ध पाणी यांच्या मिश्रणातून हे लाल पेरू सरबत तयार होते. सरबत पिताना आपल्याला आपण लाल पेरूच खात असल्याचा भास होत राहतो.
पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात आर्ती भिवंडीवाला आणि त्यांचा मुलगा तनय यांनी हे दुकान सुरू केले. दुकान सुरू करण्यापूर्वी आर्ती भिवंडीवाला घरगुती स्तरावर गुजराती खाद्यपदार्थाचा व्यवसाय करत असत; परंतु दिवसेंदिवस खवय्यांची मिळणारी वाढती पसंती पाहता त्यांनी आपल्या स्वत:च्या दुकानात आपल्या मुलासमवेत हा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. याशिवाय शेजवान ढोकळा, पाव-भाजी ढोकळा, ढोकळा-चाट, मेयॉनीज ढोकळा, नाचोज् ढोकळा आदी ढोकळ्याचे प्रकार आगामी काळात सुरू करण्याचा तनय भिवंडीवाल यांचा विचार आहे. आर्तीज किचन द टेस्ट ऑफ गुजरात येथे खमण ढोकळा, शेव खमणी, बाजरी मेथी ठेपला, मेथी ठेपला आदी पदार्थही मिळतात. आर्तीज किचन येथे खाद्यपदार्थ खाण्याची सोय नसून येथील खाद्यपदार्थ फक्त पार्सल स्वरूपात मिळतात; परंतु मेथी ठेपला, बाजरी मेथी ठेपला, सर्व प्रकारचा पांढरा ढोकळा, खमण ढोकळा आणि हांडवा हे येथील खवय्यांच्या विशेष पसंतीचे खाद्यपदार्थ आहेत.
पांढरा ढोकळा-चटणी : ३० रुपये
स्टफ चीझ गार्लिक ढोकळा : ६० रुपये
पनीर भूर्जी ढोकळा : ७० रुपये
मसाला कॉर्न ढोकळा : ६० रुपये
ग्रीन ढोकळा : ६० रुपये
मेथी ठेपला : १० रुपये
बाजरी मेथी ठेपला : १२ रुपये
लाल पेरू सरबत : ३० रुपये

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा