२८ दिवसात ४०४ ग्रामपंचायतींत रुग्णवाढ नाही

ठाणे: करोना नियमांचे काटेकोरपणे पालन आणि करोनाविषयक जागरूकता यामुळे करोनाच्या दोन्ही लाटेत ठाणे ग्रामीण भागातील सात ग्रामपंचायतीत अद्यापपर्यंत एकही करोना रुग्ण आढळून आलेला नाही. मुरबाड तालुक्यातील काही गावांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिली.

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शहरी व ग्रामीण भागातही करोना रुग्णांचे प्रमाण अधिक होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात प्रभावशाली उपाययोजना पहिल्या लाटेपासून राबविल्या जात आहेत. या उपाययोजनेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे मागील काही दिवसांपासून ठाणे ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी मागील २८ दिवसात ४०४ ग्रामपंचायतीत एकही करोना रुग्ण आढळून आलेला नाही. चाचणी, उपचार, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध, लसीकरण आणि जनजागृती या पंचसूत्रीवर विशेष भर दिला जात असल्यामुळे सद्यस्थितीला ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात सर्वत्र थैमान घातलेल्या करोना विषाणूचा शिडकाव ग्रामीण भागात होऊ नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर अनेक उपाययोजना आखण्यात आल्या होत्या.

नियमांविषयी जनजागृती

ठाणे ग्रामीण भागातील सात ग्रामपंचायती अशा आहेत की या गावांत करोनाच्या दोन्ही लाटेत एकही रुग्ण आढळून आला नसल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये मुरबाड सात आणि शहापूर तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे. करोनाचा प्रादुर्भाव या गावात होऊ नये यासाठी ग्रामपंचायत स्तरावर मोठय़ा प्रमाणात करोना नियमांविषयी जनजागृती करण्यात येत होती.