scorecardresearch

करोनाकाळात पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना प्रत्यक्षात

गणेश मूर्ती विसर्जनासाठी राबविण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांच्या संकल्पनेमुळे शहरातील तलावामधील पाण्याचे प्रदूषण रोखण्यास मदत होत असली तरी मोठय़ा गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे खाडीतील पाणी प्रदूषित होत होते.

पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालातील निष्कर्ष

ठाणे : गणेश मूर्ती विसर्जनासाठी राबविण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांच्या संकल्पनेमुळे शहरातील तलावामधील पाण्याचे प्रदूषण रोखण्यास मदत होत असली तरी मोठय़ा गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे खाडीतील पाणी प्रदूषित होत होते. मात्र, करोनाकाळात घरच्या घरी विसर्जन, लहान तसेच शाडूच्या मूर्तीचा वापर करून गणेशोत्सव साजरा झाल्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे निष्कर्ष पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालात नोंदविण्यात आले आहेत.

रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी तसेच निर्बंध लागू केले जात आहेत. टाळेबंदी तसेच निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. विविध करांची अपेक्षित वसुली होत नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचाही आर्थिक गाडा रुळावरून घसरल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी करोना संकटाच्या काळात काही सकारात्मक बदल झाल्याचे समोर आले आहे. या काळात पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे निष्कर्ष पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालात नोंदविण्यात आले आहेत. 

करोना संकटाच्या काळात गणेशोत्सवात बदल घडून आल्याचे दिसून येत आहे. २०२० मध्ये २३ हजार ११७ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. तर, २०२१ मध्ये त्यात वाढ होऊन २९ हजार १२६ गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. करोना संसर्ग टाळण्यासाठी घरच्या घरीच विसर्जन ही संकल्पना राबविण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्यास प्रतिसाद देत नागरिकांनी ही संकल्पना अमलात आणल्याचे दिसून येत असल्याचे अहवालात म्हटले आहे. ज्यांना घरच्या घरी विसर्जन शक्य नाही, त्यांनी शाडू मातीच्या गणेशमूर्तीचा अवलंब केला. काही मोठय़ा मंडळांनी गणेशोत्सव रद्द केल्याने गणेशमूर्तीच्या संख्येत घट झाली. त्याचबरोबर मंडळांनी लहान मूर्तीना प्राधान्य दिले. परंतु पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठीच्या सर्व संकल्पना नागरिकांनी करोनाकाळात सत्यात उतरविल्या असून त्याचा फायदा पर्यावरणास झालेला दिसून येतो, असेही अहवालात म्हटले आहे. दीड दिवसांच्या विसर्जनावेळी संकलित होणाऱ्या निर्माल्यात २०२१ मध्ये ५० टक्के घट झाली आहे. तसेच निर्माल्यात प्लास्टिक, थर्माकोल, रंगीबेरंगी चमकी, चायना मेड वस्तू नव्हत्या, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona period concept eco friendly ganeshotsav festival ysh

ताज्या बातम्या