मृत्यूही वाढले; मुरबाडमध्ये सरळगाव, वडवली, उंबरपाडय़ात सर्वाधिक रुग्ण

बदलापूर : ठाणे जिल्ह्यात लसीकरणात आघाडी घेणाऱ्या मुरबाड तालुक्यात गेल्या काही दिवसांत महामार्गाशेजारच्या गावांमध्ये करोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. मुरबाड तालुक्यात मुंबई-अहमदनगर महामार्गावर असलेल्या बाजारपेठेचे गाव म्हणून ओळख असलेल्या सरळगाव, वडवली, उंबरपाडा या गावांमध्ये मोठय़ा संख्येने करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मृत्यूंची संख्याही अधिक असल्याने प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. या संपूर्ण गावांची चाचणी केली जात असून गावात संचारबंदीसदृश चित्र आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरबाड तालुक्यात लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वीपणे सुरू आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण तालुक्यात झाल्याने संसर्ग रोखण्यास मदत होईल, अशी आशा होती. मात्र कल्याण-अहमदनगर राज्यमार्गाशेजारी असलेल्या गावांमध्ये करोना संसर्ग गेल्या काही दिवसांत वाढल्याचे दिसून आले आहे. यात तालुक्यातील सरळगाव या मोठय़ा बाजारपेठेच्या गावाचा समावेश आहे. तसेच वडवली, उंबरपाडा या गावांमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये करोनाचे रुग्ण मोठय़ा संख्येने वाढले आहेत. वडवली गावात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सरळगाव ग्रामपंचायतीत येणाऱ्या उंबरपाडा, दहीगाव या गावांत गेल्या १५ दिवसांत २८ मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सरळगावमध्ये दररोज शेकडो शेतकरी, कामगार, मजूर व्यवसाय, खरेदी-विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी संसर्ग वाढल्याची भीती आहे.

टाळेबंदीची अंमलबजावणी नाही

मुरबाड तालुक्यात आतापर्यंत २ हजार ७७४ रुग्ण आढळून आले असून १०६ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांमध्ये छुप्या पद्धतीने सुरू असलेले कार्यक्रम, लग्न, हळदी सोहळे यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढल्याचा दावा आरोग्य यंत्रणेद्वारे केला जातो आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मुरबाडमध्ये कडक टाळेबंदी जाहीर करून संसर्ग रोखण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र टाळेबंदीतही अशा प्रकारे संसर्ग वाढल्याने टाळेबंदीच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या तीनही गावांमध्ये तातडीने करोना चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात लसीकरण पूर्वपदावर आल्यास या प्राधान्याने तालुक्यातील सर्वाचे लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. गावात आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

-किसन कथोरे, आमदार, मुरबाड