|| कल्पेश भोईर

वाहन नोंदणीत २५ ते ३० टक्क्यांची घट

वसई : मागील वर्षी सुरू झालेल्या करोनाचा कहर कायम राहिला आहे. करोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदी व निर्बंध याचा मोठा फटका विविध क्षेत्रांना बसला असून वाहन नोंदणीलाही याचा फटका बसला आहे. गेल्या आर्थिक वर्षात केवळ ५४ हजार ५५९ वाहनांची नोंद झाली असून मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत वाहन नोंदणीमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे.

करोनाच्या संकटामुळे लावलेल्या टाळेबंदीमुळे वाहनांची खरेदी-विक्री याचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र दिसून आले आहे. तर विशेषत: मागील वर्षी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये सर्व काही ठप्प होते याचाच फटका हा वाहने उद्योगांना बसला आहे.

विरार पूर्वेतील चंदनसार येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयातून वसईसह पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा कारभार चालतो. या कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने नागरिक वाहन नोंदणी, परवाना, नूतनीकरण यासह इतर कामासाठी येत असतात. परंतु करोनाकाळात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली होती. मागील वर्षी करोनामुळे काही महिने हे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे याचा परिणाम हा वाहन नोंदणीवर झाला आहे. दरवर्षी या परिवहन विभागाच्या कार्यालयात ७० हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी होत असते.परंतु यंदाच्या वाहन नोंदणीमध्ये कमालीची घट झाली आहे.

गेल्या चालू आर्थिक वर्षात २०२०-२१ मध्ये केवळ ५४ हजार ५५९ इतक्याच वाहनांची नोंदणी झाली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. सन २०१९- २० या आर्थिक वर्षात ७३ हजार १४१ वाहनांची नोंदणी झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी १८ हजार ५८२ ने घट झाली आहे. म्हणजेच २५ ते ३० टक्क्यांनी वाहन नोंदणीचे प्रमाण कमी झाले आहे. सध्याच्या झालेल्या वाहन नोंदणी मध्ये ४३ हजार २११ दुचाकी, ८३७ ऑटोरिक्षा, २ हजार २५६ वाहतूक टेम्पो, ९६ ट्रॅक्टर , ४८ रुग्णवाहिका, ७ हजार ४८१ मोटार कार यासह इतर वाहनांचा समावेश असल्याची माहिती वसई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ग्राहकांची वाहन खरेदीकडे पाठ

दरवर्षी सणासुदीला नवीन वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो मात्र मागील काही वर्षांपासून वाहन खरेदी करण्याकडे असलेला सर्वसामान्य नागरिकांचा कल कमी झाला आहे. बहुतेक ग्राहक हे कर्ज घेऊन वाहने खरेदी करतात. करोना संकटामुळे नागरिकांना पगार वेळेत मिळतील की नाही गाडीच्या कर्जाचा हप्ता वेळेत फेडला जाईल की नाही या भीतीने अनेकांनी वाहने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे वाहन खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या ५० टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती  श्री मोटर्स वाहन विक्रेते दर्पण चौधरी यांनी सांगितले आहे. त्यातच यंदाच्या वर्षीही तीच परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. नुकताच गेलेला गुढीपाडवा हा शासनाने लागू केलेल्या निर्बंधांमुळे मंदीचा गेला असल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले आहे.