जिल्हा परिषदेकडून आढावा घेण्याचे काम; स्थानिक पातळीवर चर्चा करून नियोजन

ठाणे : जिल्ह्यातील ३१४ गावे करोनामुक्त असल्याने या गावांमध्ये राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर चर्चा करण्याबरोबरच शाळांना पत्र व्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यांतील काही गावांनी शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला असून त्या भागातील शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरली आहे. या लाटेनंतर शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर करोनामुक्त गावांमध्ये तसेच करोनाविषयक जागरूकता असलेल्या गावांमध्ये ८ ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने नुकतीच परवानगी दिली आहे. स्थानिक गाव पातळीवर चर्चा करून १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या सूचना राज्य शासनाने केल्या आहेत. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने ३१४ करोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी गावांमधील परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच स्थानिकांसोबत चर्चा सुरू केली आहे.

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, वैद्यकीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य या सर्वांची गावपातळीवर समिती नेमली आहे. ही समिती शाळा सुरू करण्याबाबत पालकांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करीत आहे. त्यामध्ये शाळा सुरू करण्याबाबत पालकांची मते संमिश्र असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बहुतांशी पालकांनी शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली. तर काहींनी करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे गेलेला नसल्यामुळे शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवण्याची सूचना केली आहे. तसेच अंबरनाथ तालुक्यातील दोन तर मुरबाड तालुक्यातील सात गावांनी शाळा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला असून यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मान्यतेने याठिकाणी लवकरच शाळा सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. महिनाभरात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. अशा गावांमधील शाळांमध्ये निर्जुंतीकरणाचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. तसेच संबंधित गावातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर शिक्षकाचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, पालक पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी इच्छुक नसतील तर त्यांना कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करण्यात येणार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यात येईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

करोनामुक्त झालेले गाव तसेच करोनाविषयक जागरूकता असलेल्या गावांमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन असून त्यासाठी आढावा घेण्याचे काम सुरू आहे. – ललिता कावडे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, ठाणे जिल्हा

 

गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. सध्या करोना परिस्थिती नियंत्रणात असून ऑनलाइन आभासी शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष शिक्षण कधीही चांगले आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्यास मी तयार आहे. – डॉ. हरिश्चंद्र भोईर, पालक

करोना संसर्गामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाच्या संदर्भात असलेल्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच प्रत्यक्ष शाळा सुरू होत असल्याने शिक्षकांमध्ये उत्साह आहे. – विनोद लुटे, शिक्षक