scorecardresearch

करोना निर्बंधांमुळे खिल्लार बैलांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार ऑनलाइन

जुन्नर, नगर, घोटी, मुरबाड, म्हसा, सरळगाव या भागात खिल्लार बैल विक्रीच्या मुख्य अशा बाजारपेठा आहेत. उत्तम दर्जाचे आणि बैलगाडा शर्यतीत मातब्बर असे खिल्लार बैल या बाजारांमध्ये उपलब्ध असतात. मात्र, हे बाजार बंद असून सार्वजिनक ठिकाणी गर्दी करण्याची परवानगी नसल्यामुळे बैलगाडा शर्यती खेळणारे दर्दी अडचणीत सापडले आहेत. बैलगाड्यांसाठी लागणारे खिल्लार बैल खरेदीसाठी ठाणे, रायगड, नगर, जुन्नर भागात जाता येत नसल्याने आता या मंडळींनी खिल्लार बैलांची ऑनलाइन पद्धतीने खरेदी विक्री सुरू केली आहे.

|| भगवान मंडलिक

दोन वर्षांपासून प्राण्यांचे बाजार बंद; बैलगाडा शर्यती खेळणारी दर्दी अडचणीत

कल्याण : गावोगावी प्रवासाचे मुख्य साधन असलेल्या एस.टी बसची चाके संपामुळे रुतलेली तर करोना रुग्णांच्या वाढत्या संसर्गांमुळे प्रमुख बाजारही बंद असल्यामुळे बैलगाडा शर्यतींसाठी लागणारे खिल्लार बैलांची खरेदी- विक्रीचे व्यवहार चक्क ऑनलाइन पद्धतीने होऊ लागले आहेत.

जुन्नर, नगर, घोटी, मुरबाड, म्हसा, सरळगाव या भागात खिल्लार बैल विक्रीच्या मुख्य अशा बाजारपेठा आहेत. उत्तम दर्जाचे आणि बैलगाडा शर्यतीत मातब्बर असे खिल्लार बैल या बाजारांमध्ये उपलब्ध असतात. मात्र, हे बाजार बंद असून सार्वजिनक ठिकाणी गर्दी करण्याची परवानगी नसल्यामुळे बैलगाडा शर्यती खेळणारे दर्दी अडचणीत सापडले आहेत. बैलगाड्यांसाठी लागणारे खिल्लार बैल खरेदीसाठी ठाणे, रायगड, नगर, जुन्नर भागात जाता येत नसल्याने आता या मंडळींनी खिल्लार बैलांची ऑनलाइन पद्धतीने खरेदी विक्री सुरू केली आहे.

ग्रामीण भागातील मनोरंजनाचे मुख्य साधन म्हणजे बैलगाडा शर्यती. अनेक वर्ष या शर्यती प्राणी मित्र संघटनेने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकांमुळे बंद होत्या. आता न्यायालयाने काही अटी शर्तींसह या शर्यतींना परवानगी दिली आहे.

ठाणे, रायगड जिल्ह्यात बैलगाडा शर्यती खेळणारे हौशी, दर्दी सर्वाधिक आहेत. बैलगाडा शर्यती सुरू झाल्या पण करोना संसर्गामुळे सर्व प्रकारच्या बैलांचे जुन्नर, मुरबाड जवळील म्हसा, सरळगाव, नगर, घोटी (नाशिक) भागात भरणारे बाजार मागील दोन वर्षांपासून बंद आहेत. मुरबाड तालुक्यातील म्हसा जत्रेत महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील खिल्लार, शर्यतीचे बैले विक्रीसाठी आणले जातात. करोना संसर्गामुळे ही यात्रा दोन वर्ष रद्द भरवली जात नाही. म्हसा जत्रा आता सुरू होणार  होती. या जत्रेत बैलगाडा मालकांनी बैल खरेदी करण्याची सज्जता केली होती. परंतु, करोना विषाणूच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूमुळे कठोर निर्बंध लागू झाले. ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. बैलगाडा मालकांचा सर्वाधिक हिरमोड झाला आहे.

अनेक बैलगाडा मालकांनी आता ऑनलाइन पद्धतीने बैल खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू केले आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी चांगला बैल कोठे मिळतो याचा शोध घ्यायचा. त्या जिल्हा, तालुका, गावातील बैल मालकाला संपर्क करून त्याच्याशी मोबाइलच्या माध्यमातून संपर्क केला जातो. बैलाची माहिती बैल मालकासह गावातील इतर पंचांकडून घेतली जाते.

बैलाची किंमत निश्चित करून व्यवहार पूर्ण केला जातो. बैल विक्रेत्यांकडून बैल टेम्पोमध्ये भरून खरेदीदाराच्या दारात आणून सोडला जातो. असा परस्पर विश्वास आणि सहमतीने हे व्यवहार आता सुरू झाले आहेत, अशी माहिती बैलगाडा शर्यतीमधील दर्दी पोशा भोईर यांनी दिली.

बैलांची नावे आणि किमती

कपाळी चाँद, काजळी, बादशाह, शेहनशहा, अमर, बिनजोड, कोसा, महाराजा, चित्ता, राजबिंड, सर्जा, राजा अशा नावाने खिल्लार बैलांना ओळखले जाते. चार लाख रुपयांपासून ते पुढे १५ ते २० लाख रुपयांपर्यंत व्यवहार खिल्लार बैल विक्रीच्या माध्यमातून केला जातो.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona virus restriction bullion trading online akp

ताज्या बातम्या