अन्यथा कठोर र्निबध लावण्याचा आयुक्तांचा इशारा
जयेश सामंत, लोकसत्ता
ठाणे : ठाणे शहरात सलग २१ दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी या साथीचा प्रादुर्भाव अजूनही अल्प उत्पन्न तसेच मध्यम वर्गीय वस्त्यांमध्ये फारसा दिसून आलेला नाही. घोडबंदर तसेच झपाटय़ाने विकसित होत असलेल्या नव्या ठाणे शहरातील मोठी नागरी संकुले तसेच उच्चभ्रूवस्त्यांमध्ये नागरिकांना करोनाची लागण अधिक प्रमाणात होताना दिसत असली तरी हा विषाणू दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये पसरु नये यासाठी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि अशी वेळ ओढावून घेऊ नये, असे आवाहनवजा इशारा ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी लोकसत्ताला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना दिला.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर सापडू लागले आहेत. बुधवारी ठाणे शहरात रुग्णसंख्या शंभराहून अधिक तर कल्याण डोंबिवलीत दररोजच्या तुलनेत २०० पेक्षा अधिक रुग्ण सापडल्याने शासकीय यंत्रणा सावध झाल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत रुग्णसंख्या ४००च्या घरात पोहताच महापालिकेने तातडीने बैठक घेत शहरात निर्बध लागू केले आहेत. सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेतच इतर दुकाने सुरू ठेवण्यात येतील असे जाहीर करण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्याशी बातचीत केली असता ठाण्यात अजूनही अधिक निर्बधांची सध्या तरी गरज नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत असून गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. रुग्णसंख्या अटोक्यात रहावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याची गरज आहे. महापालिकेला सहकार्य करा आणि निर्बध टाळा, असे आवाहन डॉ. शर्मा यांनी केले.
महापालिका सज्ज
सद्यस्थितीत ठाणे शहरात जे रुग्ण सापडत आहेत. त्यातील बरेचसे लक्षणे नसलेले तसेच घरीच विलगीकरणात उपचार घेणारे आहेत. याशिवाय पूर्वीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहेत. तरीही बेसावध रहाण्याचे कारण नाही, असे डॉ.शर्मा यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील ७० टक्क्य़ांहून अधिक खाटा रिकाम्या असून मोठय़ा प्रमाणावर कृत्रिम श्वसन यंत्रणाही सज्ज आहे. याशिवाय लसीकरणाचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. यापुढे २४ तास लसीकरण यंत्रणा कार्यान्वित होईल अशा पद्धतीची तयारी केली जात आहे, असा दावाही डॉ.शर्मा यांनी केला.
उच्चभ्रू वस्त्यांमध्ये लागण
ठाणे शहरात बुधवारी २५२ रुग्णसंख्या आढळून आली. रुग्णवाढीचा हा सलग २१ दिवस होता. या काळात एक गोष्ट प्रकर्षांने जाणवत आहे ती म्हणजे नव्याने आढळणारे रुग्ण इमारतींमध्ये तसेच उच्चभ्रू वस्त्यांमधील आहेत. ठाणे शहरातील बराचसा भाग दाटीवाटीचा असून तेथे अजूनही फैलाव झालेला आढळत नाही. उच्चभ्रू वस्त्यांमधील बहुतांश नोकरदार अजूनही घरातून काम करताना दिसतात. तसेच गर्दीच्या ठिकाणी, भाजी मंडयांमध्ये अशा नागरिकांचा वावर कमी दिसतो. तरीही या वस्त्यांमधील अनेक रहिवाशांना लागण होत आहे याची कारणे वेगवेगळी असू शकतात, असे ते म्हणाले.
