शहरातील तीस टक्क्यांहून अधिक दैनंदिन रुग्ण घोडबंदरमध्ये

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात दररोज सरासरी आढळणाऱ्या सुमारे पंधराशेपैकी पाचशे रुग्ण एकटय़ा घोडबंदर भागातील असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने पाचपेक्षा जास्त रुग्ण असलेल्या इमारती आणि परिसरांचे सर्वेक्षण करून १२७ लहान प्रतिबंधित क्षेत्रांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्येही घोडबंदर परिसर आघाडीवर असून १२७ पैकी ४९ लहान प्रतिबंधित क्षेत्रे एकटय़ा घोडबंदर भागात असल्याचे समोर आले आहे. यामुळे मोठी गृहसंकुले असलेल्या घोडबंदर परिसराला करोनाचा विळखा बसल्याचे चित्र आहे. तर गेल्या वर्षी सर्वाधिक संसर्गाचे ठिकाण असलेल्या मुंब्रा परिसरात मात्र करोनाचा यंदा प्रादुर्भाव कमी असून यामुळे या ठिकाणी एकही लहान प्रतिबंधित क्षेत्र नसल्याचे समोर आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या महिनाभरापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शहरात आतापर्यंत ८५ हजार ४०६ करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७१ हजार ६७९ (८४ टक्के) रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १ हजार ४१३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच सद्य:स्थितीत शहरात १२ हजार ३१४  सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ८० टक्क्य़ांहून अधिक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. तर उर्वरित रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

शहरात आता दररोज सरासरी पंधराशेच्या पुढेच रुग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये पाचशेच्या आसपास रुग्ण एकटय़ा घोडबंदर भागातील असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. त्या तुलनेत शहराच्या इतर भागांमध्ये सरासरी शंभर ते दोनशेच्या आसपास रुग्णसंख्या आहे. महापालिका क्षेत्रातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या इमारती तसेच परिसरांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार घोडबंदर परिसरात ४९ प्रतिबंधित क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत.  शहरातील १२७ लहान प्रतिबंधित क्षेत्रामध्ये २४३४ करोना रुग्ण आहेत. तर शहरातील १२७ पैकी लहान प्रतिबंधित क्षेत्र एकटय़ा घोडबंदर भागात असून या ठिकाणी १२४० रुग्ण आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

लहान प्रतिबंधित क्षेत्राची आकडेवारी

प्रभाग समिती                 लहान प्रतिबंधित क्षेत्र    रुग्णसंख्या

माजिवाडा-मानपाडा                ४९                            १२४०

उथळसर                                १४                               १२४

दिवा                                        ४                               ३५

नौपाडा-कोपरी                        २२                                ६५

वागळे इस्टेट                            ४                                ३१

कळवा                                      ३                                –

लोकमान्य-सावरकर               ११                              १४३

वर्तकनगर                               २०                             ७७८

एकूण                                       १२७                          २४३४