ग्रामीण भागात करोना रुग्णांची फरफट

सुविधा उपलब्ध नसल्याने अडचणी; वैद्यकीय विभागाचीही धावपळ

प्रतिकात्मक छायाचित्र

कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : करोनाच्या पार्श्वभूमीवर वसईच्या ग्रामीण भागात करोना रुग्णांसाठी सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची फरफट होऊ  लागली आहे तर दुसरीकडे  अलगीकरण कक्षाची सुद्धा सुविधा उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होऊ  लागल्या आहेत.

वसई तालुका हा शहरी आणि ग्रामीण भागात मोडत असून यातील जवळपास ७० टक्के परिसर हा पालिका हद्दीत येतो तर उर्वरित परिसर हा पंचायत समितीच्या हद्दीत येत आहे. करोनाने आता ग्रामीण भागातही शिरकाव केल्याने अर्नाळा, आगाशी, पोमन, वासलई, रानगाव, टीवरी आधी भागात रुग्ण आढळून येऊ  लागले आहेत.  या रुग्णांना सेवा देण्यासाठी ग्रामीण भागातील प्रशासनाची पुरेशी व्यवस्था नसल्याने मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण होऊ  लागल्या आहेत. सुविधा उपलब्ध नसल्याने या रुग्णांना थेट बोईसर येथील टीमा रुग्णालयात घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाचीसुद्धा चांगलीच फरफट  होत आहे.  रुग्णांच्या सोबत त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची संख्या ही अधिक असते.  त्यांना नेण्यासाठी रुग्णवाहिकेची कमतरता आहे.   केवळ दोन रुग्णवाहिका आहेत त्यामुळे कधी कधी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची मदत घेऊन रुग्णांना जावे लागत असल्याचे पंचायत समितीच्या वैद्यकीय विभागाने सांगितले आहे. सद्य:स्थितीमध्ये  रुग्णांचे नमुने विरार येथील ग्रामीण रुग्णालयात जमा केले जात आहेत;  जेव्हा करोनाबाधित रुग्ण आढळून येतात तेव्हा त्यांना ठेवायचे कुठे अशा अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव यांनी सांगितले आहे.

विसंबून राहिल्याने अडचणी

वसई-विरार महापालिका व ग्रामीण या दोन्ही भागांतील रुग्णांसाठी एकाच ठिकाणी उपचार करण्याच्या सुविधा उपलब्ध होत्या. त्यामुळे पालिकेच्या क्षेत्रातील रुग्णालयात व तयार करण्यात आलेल्या ग्रामीण भागांतील रुग्णांना सेवा दिली जात होती; परंतु जेव्हा पालिकेच्या आयुक्तपदाचा डी. गंगाधरण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामीण भागातील करोनाबाधित रुग्णांची सेवा ही पालिका पुरविणार नाही असे सांगण्यात आल्याने पालिकेच्या भरवशावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील वैद्यकीय विभागाला अडचणी निर्माण झाल्या आहेत.

स्वतंत्र व्यवस्था तयार करण्यासाठी प्रयत्न

पालिकेने ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना सहकार्य करण्यासाठी नकार दिल्याने आता  ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या करोनाबाधित रुग्णांसाठी व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांसाठी वसईतच स्वतंत्र अलगीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. विरार येथील सत्पाळा सेंट जोसेफ महाविद्यालयाची पाहणी करण्यात आली असून व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी, प्रांतअधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव यांनी सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus pandemic patients facing lot of issues in village area dd70

ताज्या बातम्या