scorecardresearch

ठाणे : एकाच वेळी २८ वर्षीय महिलेला दिले करोना लसीचे तीन डोस?; भाजपाने केली चौकशीची मागणी

एकाच वेळी तीन डोस दिल्याने ही महिला प्रचंड घाबरली आणि ती घरी गेली. तिने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला ज्याने यासंदर्भातील माहिती भाजपा नगरसेविकेला दिली.

ठाणे : एकाच वेळी २८ वर्षीय महिलेला दिले करोना लसीचे तीन डोस?; भाजपाने केली चौकशीची मागणी
या महिलेची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य : रॉयटर्सवरुन साभार)

ड्राइव्ह इन पद्धतीने लसीकरण करण्याबरोबरच आता ठाणे महापालिकेच्या टीएमटी बसमध्ये १८ ते ४४ वयोगटातील प्रवाशांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. असं असतानाच दुसरीकडे ठाण्यात एकाच महिलेला करोना प्रतिबंधक लसीचे तीन डोस दिल्याचा आरोप केला जातोय. ठाणे महानगरपालिकेच्या आनंद नगर लसीकरण केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप ठाणे भाजपाने केलाय. लस घेण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय महिलेला तीनदा डोस दिलाय. या महिलेची प्रकृती स्थिर असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. मात्र करोना केंद्रावरील अशा बेजबाबदारपणावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपाने केलीय. यासंदर्भात एक समिती नेमण्यात आली असून पालिका प्रशासनाने चौकशी सुरु केल्याचं सांगितलं आहे.

नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?

समोर आलेल्या माहितीनुसार ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील आरोग्य केंद्रावर २५ जून रोजी दुपारच्या सुमारस लस घेण्यासाठी ब्राम्हांड येथे राहणारी एक महिला आली होती. मात्र त्यावेळी तिला करोना लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे तीनदा लस दिली. एकाच वेळी तीन डोस दिल्याने ही महिला प्रचंड घाबरली आणि ती घरी गेली.

आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार या महिलेने तिच्या पतीला सांगितलं. त्यानंतर यासंदर्भातील तक्रार स्थानिक महिला नगरसेवकाच्या कार्यालयात कळवण्यात आला. त्यानंतर संबंधिक अधिकाऱ्याला यासंदर्भात जाब विचारण्यात आला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. सुरुवातीला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी डॉक्टरांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपाने केलाय. या घटनेसाठी सत्ताधारी आणि पालिका जबाबदार असल्याचा आरोप भाजपा आमदार निरंजन डावखरेंनी केलाय.

नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?

यासंदर्भात ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांना विचारण्यात आलं अशता त्यांनी यासंदर्भातील चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल असं सांगितलं. मात्र त्याचवेळी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं महापौरांनी सांगितलं. मात्र तरीही होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर एक समिती नेमण्यात आली असून चौकशी करण्यात येईल असं महापौरांनी स्पष्ट केलंय. ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

नक्की वाचा >> धक्कादायक! आयसोलेशनला कंटाळलेल्या करोना पॉझिटिव्ह सासूने सुनेला मिठी मारुन केलं बाधित

गप्पा मारता मारता दिले दोन डोस

काही आठवड्यांपूर्वीच उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यामध्ये करोना लसीकरण केंद्रावर एका व्यक्तीला पाच मिनिटांच्या अंतराने करोनाचा दोन डोस  देण्यात आले होते. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचा आरोप लस देण्यात आलेल्या व्यक्तीने केला होता. लसीकरणासाठी मी गेलो तेव्हा लस देणाऱ्या नर्स एकमेकींशी गप्पा मारत होत्या. त्या गप्पांमध्ये इतक्या व्यस्त झालेल्या की त्यांनी मला पाच मिनिटांमध्ये लसीचे दोन डोस दिले असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. लसींच्या दोन डोसमध्ये नक्की किती अंतर असावं यासंदर्भात आपल्याला काहीच माहिती नव्हती असा दावाही या व्यक्तीने केला होता.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या