अल्पसंख्याक निधीचा पालिकेला विसर!

निधीचे तीन वर्षे वाटप न करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अंबरनाथ नगरपालिकेतील प्रकार; मुख्याधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर तात्काळ वाटप

शासनाने सर्व शिक्षा अभियानातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या उदात्त हेतूला प्रशासनातीलच काही अधिकाऱ्यांकडून हरताळ फासला जात आहे. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना पालिकेच्या शिक्षण विभागाकडून प्रोत्साहन देण्यासाठी वाटण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता पालिकेतील बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे गेल्या तीन वर्षांपासून पडून असल्याचे समोर आले आहे. ही बाब निदर्शनास आल्यावर अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष घालत हा निधी संबंधितांकडे पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू केली असून निधीचे तीन वर्षे वाटप न करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या १९ शाळा व ८ खासगी अनुदानित शाळांतील १२९० विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्त्याचे वाटप गेल्या तीन वर्षांपासून न करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पालिका आणि खासगी शाळेतील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढत असल्याने या घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे ओढण्यासाठी हा प्रोत्साहन भत्ता शासनाद्वारे देण्यात येतो. मुस्लीम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन आणि पारशी समाजाच्या विद्यार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिल्यास प्रत्येक दिवशी २ रुपयेप्रमाणे वर्षांतील २२० दिवस हा भत्ता देण्यात येणार होता. मात्र तो गेल्या तीन वर्षांत वाटप करण्यात न आल्याने तसाच पडून होता.

प्रशासनाधिकाऱ्याची दिरंगाई..

२०१२-१३ या वर्षांपासूनचा हा भत्ता असून त्याचा पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही प्रशासनाधिकाऱ्यांच्या दिरंगाईने हा भत्ता मुलांना देण्यात आला नव्हता. ही बाब अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या निधीचे शिक्षण विभागाला तात्काळ वाटप करण्याचे आदेश दिले असून संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना या निधीचे सध्या वाटप करण्यात येत आहे. पी. एस. मोहिते या प्रशासनाधिकाऱ्याच्या दिरंगाईमुळे हा निधी वाटला न गेल्याने या अधिकाऱ्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी शिफारसही करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corporation forgot about minority funds

ताज्या बातम्या