ठाणे : राज्य शासन तसेच इतर विभागांच्या अखत्यारित असलेल्या शहरातील रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे दरवर्षी टिकेचे धनी ठरत असलेल्या ठाणे महापालिकेने हे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागांकडे आर्जव सुरु केले असून त्यापाठोपाठ आता या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये यासाठी पालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्य शासन तसेच इतर विभागांच्या अखत्यारित असलेल्या शहरातील रस्त्यांचे नकाशे, संबंधित अधिकाऱ्याचे नाव आणि त्यांचा मोबाईल क्रमांक असे फलक लावले जाणार असून त्याचबरोबर यासंबंधीच्या माहितीचे पत्र स्थानिक पोलिसांना दिले जाणार आहे. त्यात या रस्त्यांवर खड्डे पडल्यास, पाणी साचल्यास किंवा दुर्घटना घडल्यास संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार असतील, असे नमूद करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. या वृत्तास अतिरिक्त नगरअभियंता अर्जुन अहिरे यांनी दुजोरा दिला आहे.

ठाणे शहरातून मुंबई-नाशिक तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. हे दोन्ही महामार्ग पालिका क्षेत्रातून जात असले तरी ते सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतात. या मार्गावर दरवर्षी खड्डे पडून अपघात होता. या खड्ड्यातून वाट काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. आपल्या अखत्यारित नसलेल्या या रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टिका होते. या रस्त्यावरील खड्डे भरणीची कामे पालिकेने केली होती. मात्र, त्यासाठी खर्च झालेला निधीही पालिकेला संबंधित विभागाकडून मिळत नाही. या खड्डयांमुळे ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना गेल्या वर्षी निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. यंदाही महामार्ग तसेच काही उड्डाणपुलांवर खड्डे पडू लागल्याने वाहनकोंडी वाढू लागली आहे. त्यामुळे तुमच्या खड्डयांचा भार आमच्या खांद्यावर नको अशी भूमीका घेत तातडीने उपाययोजना करा अशा सूचना महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित विभागाला केली आहे.

ठाणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची नुकतीच एक बैठक घेतली. यामध्ये राज्य शासन तसेच इतर विभागांच्या अखत्यारित असलेल्या शहरातील रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघात झाले तर, पोलिसांकडून पालिकेकडे विचारणा करण्यात येते. काही वेळेस पालिका अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जातो, अशी माहिती अभियंत्यांकडून देण्यात आली. त्यानंतर असे प्रकार टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बैठकीत मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार राज्य शासन तसेच इतर विभागांच्या अखत्यारित असलेल्या शहरातील रस्त्यांचे नकाशे, संबंधित अधिकाऱ्याचे नाव आणि त्यांचा मोबाईल क्रमांक असे फलक लावले जाणार असून त्याचबरोबर यासंबंधीच्या माहितीचे पत्र स्थानिक पोलिसांना दिले जाणार आहे. त्यात या रस्त्यांवर खड्डे पडल्यास, पाणी साचल्यास किंवा दुर्घटना घडल्यास संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार असतील, असे नमूद करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी यंत्रणा तयार ठेवण्याची सुचना इतर विभागांना द्यावी. तसेच या विभागांना रस्ते दुरुस्तीसाठी सहकार्य लागल्यास ते तात्काळ करावे. महापालिकेच्या अखत्यारित येत असलेले रस्ते, पदपथ, चेंबर झाकणे, या कामांबाबत यापुर्वीच सुचित केल्याप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सुचना नगर अभियंता सोनाग्रा आणि अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी पालिका अभियंत्यांना दिल्या आहेत, असेही सुत्रांनी सांगितले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत रहावे आणि इतर प्राधिकरणांनीही गार्भायाने दखल घ्यावी. यासाठी आम्ही पोलिस ठाण्यात रस्त्यांच्या माहितीची प्रत पोलिसांना देणार आहोत. तसेच पालिका क्षेत्रातील रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते तात्काळ बुजविण्याच्या सुचना पालिका अभियंत्यांना करण्यात आल्या आहेत.

अर्जुन अहिरे, अतिरिक्त नगरअभियंता, ठामपा