ठाणे:  अनधिकृत दुकानांवरील कारवाई टाळण्यासाठी दुकानदारांकडून ५० लाख रुपयांची लाच घेताना भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती (६२) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

पद्मानगर भागातील भाजी बाजारात १०० अनधिकृत दुकाने आहेत. या अनधिकृत दुकानांविरोधात कारवाई करण्यासाठी  कामुर्ती यांनी भिवंडी महापालिकेत अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी तसेच दुकानांवरील कारवाई टाळण्यासाठी सिद्धेश्वर यांनी दुकानदारांकडे दोन कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ५० लाख रुपये देण्याचे ठरले . यानंतर ३० सप्टेंबरला दुकानदारांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कामुर्ती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या

आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, कामुर्ती यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले, बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कामुर्ती यांना ५० लाख रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. कामुर्ती यांच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.