खाडीकिनारी अनधिकृत बांधकामांना ऊत; अधिकाऱ्यांना धमक्या
डोंबिवली पूर्व भागातील आयरे, कोपर पूर्व भागात खारफुटी तोडून सुरू असलेल्या बेकायदा चाळी, गाळ्यांची बांधकामे, रेतीबंदर खाडी किनारा परिसरात माणकोली उड्डाणपुलाच्या प्रस्तावित रस्त्याच्या दुतर्फा सुरू असलेल्या बेकायदा चाळी आणि गाळ्यांच्या बांधकामांना काही नगरसेवकांचा पाठिंबा आहे, असे बेकायदा बांधकामे तोडणाऱ्या पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
मातब्बर असलेले हे नगरसेवक आपल्या समर्थकांच्या पुढाकाराने ही बेकायदा बांधकामे करीत आहेत. बेकायदा चाळी, गाळे बांधून तेथे भाडेकरू, रहिवासी घुसवायचे, त्यांच्याकडून केलेल्या बांधकामांचे पैसे वसूल करायचे, अशी नीती या भूमाफियांकडून अवलंबली जात आहे. या बेकायदा बांधकामांच्या ठिकाणी फिरकायचे नाही, अशी तंबी समर्थकांच्या भ्रमणध्वनीवरून, प्रत्यक्ष भेटीतून या नगरसेवकांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिलेली असते. त्यामुळे अधिकारीही नसती कटकट नको म्हणून या बेकायदा बांधकामांच्या ठिकाणी फिरकणे बंद करतात आणि समर्थकांच्या साहाय्याने चिरीमिरी मिळवून गप्प राहणे पसंत करतात, असे एका जाणकाराने सांगितले.
कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातील आयरे, कोपर, भोपर भाग काही भूमाफिया, नगरसेवक, गावगुंडांनी वाटून घेतला आहे. कोणी कोणत्या हद्दीत बेकायदा चाळी, गाळे बांधायचे याचे वाटप करण्यात आले आहे. सध्या डोंबिवली पश्चिमेतील एक मातब्बर बाहुबली नगरसेवक कोपर पूर्व भागात आपल्या समर्थकांच्या साथीने बेकायदा बांधकामे करीत आहे. या नगरसेवकाच्या आधिपत्याखाली कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातील ६० टक्के भाग आहे. या सगळ्या भूभागावर अन्य कोणी माफिया पाय ठेवण्यास तयार नाही. त्यामुळे एकहाती चाळी, गाळे बांधण्याचा या नगरसेवकाच्या समर्थकांचा उद्योग सुरू आहे, असे कर्मचाऱ्यांच्या चर्चेतून समोर आले आहे.
रेतीबंदर भागात काही नगरसेवकांच्या आशीर्वादाने बेसुमार चाळी, गाळे उभारण्यात येत आहेत. या भागातील खाडीवर माणकोली उड्डाणपूल प्रस्तावित आहे. त्यामुळे खाडी किनाऱ्याच्या मोक्याच्या सरकारी, वन विभागाच्या जमिनी बळकावण्याची स्पर्धा या भागातील भूमाफियांमध्ये लागली आहे. काही नगरसेवक या चाळी, गाळे बांधण्यामध्ये अग्रभागी आहेत, असे पालिका कर्मचाऱ्यांकडून समजते. या विषयावर अधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.

भूमाफियांच्या चाळींना मात्र मुबलक पाणी
या बेकायदा चाळींना कोपर पश्चिम रेल्वे स्थानक भागातून पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून पाण्याचा चोरून पुरवठा करण्यात येत आहे. ही जलवाहिनी पालिका कर्मचाऱ्यांनी तोडली की, ती पुन्हा रात्रीतून जोडण्यात येते. बाहुबली नगरसेवकाचा हा उद्योग असल्याने पालिका कर्मचारी ही जलवाहिनी काढून टाकण्यास घाबरत असल्याचे समजते. आयुक्त ई. रवींद्रन यांना या चोरीच्या जलवाहिनीची माहिती घेऊन ती बुडासकट तोडून टाकण्याची मागणी या भागातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. करदात्या सामान्यांना पैसे भरूनही पाणी मिळत नाही.