अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मालमत्ता, पाणीपट्टी कर दराचा प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन आणि सर्वसाधारण सभेत सुरू होता. या विषयाच्या माध्यमातून थकबाकीदार विकासकांचे हित साधण्याचा प्रयत्न काही पदाधिकाऱ्यांकडून सुरू होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता नियमबाह्य़ पद्धतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला हजेरी लावल्यास प्रकरण महागात पडेल, या भीतीने अनेक नगरसेवकांनी सभेकडे पाठ फिरवली. अखेर कॉ. गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली वाहून सर्वसाधारण सभा अवघ्या दहा मिनिटांत आटोपती घेण्यात आली.
शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत मालमत्ता करदर निश्चित व मंजुरीचा प्रस्ताव प्रशासनातर्फे आणण्यात आला होता. विकासकांची पाठराखण करीत आणलेल्या या विषयाला सेनेचे नगरसेवक प्रकाश पेणकर, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी हरकत घेतली. मालमत्ता, पाणीपट्टीचे दर जानेवारीमध्ये मंजूर करणे आवश्यक होते. महापालिकेचा अर्थसंकल्प पंधरा दिवसांपूर्वी सादर करण्यात आला आहे. असे असताना जुन्याच दराने निश्चित करून प्रशासन कोणाचे हित साधत आहे, असे प्रश्न पेणकर, राणे यांनी उपस्थित केले. आयुक्त मधुकर अर्दड सभागृहाला कोणतेही ठोस उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे महापौर कल्याणी पाटील यांनी शुक्रवारची सभा तहकूब करून ती पुन्हा घेण्याचे जाहीर केले.