ठाणे : भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात दाखल असलेल्या लैंगिक अत्याचार आणि धमकीप्रकरणी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बुधवारी अर्जावरील सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांच्या न्यायालयात झाली. न्यायाधीश ब्रह्मे यांनी दोन्ही बाजूकडील वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ते गुरुवारी या प्रकरणाचा निर्णय देणार आहे.  भाजपचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्याविरोधात ४८ वर्षीय महिलेने लैंगिक अत्याचार आणि धमकीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे त्यांच्याविरोधात नेरूळ आणि सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. या वेळी सरकारी वकिलांनी हा गंभीर गुन्हा असून यामध्ये गणेश नाईक यांची पोलीस कोठडी मिळणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद केला. तर गणेश नाईक यांच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश ब्रह्मे यांनी याप्रकरणी गुरुवारी निर्णय देण्याचा निर्णय घेतला आहे.