डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी, रिक्षा चोरून त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या एका तरूणाला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी नऊ महिने साधा कारवास आणि प्रत्येकी तीन गुन्ह्यांमध्ये एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास १० दिवस वाढीव कारावासाची शिक्षा आरोपीला भोगायची आहे.
रमजान इब्राहिम शेख (१८) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षी विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध भागातून दुचाकी, रिक्षा चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. या चोरी प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात वाहन मालकांच्या तक्रारीवरून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल होते. पोलिसांनी तपास करून रमजान शेख याला अटक केली होती. त्याने वाहनांची चोरी केली असल्याची कबुली पोलिसांना दिली होती.
याप्रकरणी पोलिसांनी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. मागील दीड वर्ष या प्रकरणी कल्याण न्यायालयात सुनावणी सुरू होत्या. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपीला नऊ महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली.
विष्णुनगर पोलीस ठाण्याचे हवालदार पी. एस. पाटणकर, के. एल. लोखंडे यांनी गुन्ह्यांचा तपास केला. पोलीस-न्यायालय समन्वयक म्हणून ए.के. रोंगटे, सरकारी वकील भिंगारदिवे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन सावंत यांनी या प्रकरणात काम पाहिले.