ठाणे : ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या कोर्टनाका येथील वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठी वेग नियंत्रण पट्ट्या (रम्बलर) बसविण्याची चाचपणी ठाणे महापालिकेकडून सुरु आहे. हा प्रयोग अपयशी ठरल्यास येथे सिग्नल यंत्रणा उभारता येईल का, याचाही अभ्यास ठाणे महापालिका आणि वाहतुक पोलिसांकडून सुरू आहे. कोर्टनाका भागात कोर्टनाका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालये आहेत. त्यामुळे हा मार्ग रहदारीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
कोर्टनाका येथून हजारो हलकी वाहने ठाणे रेल्वे स्थानक, बाजारपेठेच्या दिशेने वाहतुक करतात. तसेच कोर्टनाका परिसरात ठाणे न्यायालयाची इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचे मुख्यालये, शासकीय विश्राम गृह आहे. तसेच या चौकापासून काही मीटर अंतरावर महाविद्यालय आणि एक शाळा देखील आहे. कळवा, घोडबंदर, वृंदावन, गोकुळनगर, माजिवडा भागातील हजारो वाहने याच मार्गाने पुढे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहतुक करतात. त्यामुळे हा मार्ग अतिशय वर्दळीचा आहे.
कोर्टनाका येथील अशोक स्तंभ असलेल्या चौकाजवळ तीन ते चार रस्ते जोडले गेले आहेत. त्यामुळे या मार्गावर भरधाव वाहनांना आवर घालण्यासाठी वेग नियंत्रण पट्ट्या बसविण्याची चाचपणी ठाणे महापालिका आणि वाहतुक विभागाकडून सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि वाहतुक पोलिसांनी या परिसराचे सर्वेक्षण केले. येत्या काही महिन्यांत या मार्गावर वेग नियंत्रण पट्ट्या बसविल्या जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.या भागात काही वाहन चालक हे अतिवेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अपघात होऊ नये यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वेग नियंत्रण पट्ट्या बसविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
वेग नियंत्रण पट्ट्यानंतरही येथील वाहनांच्या वेगावर नियंत्रण बसले नाही तर, येथे सिग्नल यंत्रणा बसविण्याबाबतचा अभ्यास देखील केला जात आहे. परंतु सिग्नल यंत्रणा बसविल्यास येथे मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथील मार्गिका अरुंद आहेत. त्यात सिग्नल यंत्रणा बसविल्यास त्याचा परिणाम कोर्टनाका ते मिनाताई ठाकरे चौकापर्यंत बसविण्याची शक्यता आहे.