scorecardresearch

कल्याण : दिवा बेतवडे गावातील मयत मासळी विक्रेतीच्या मुलाला चार लाखाची भरपाई

मुलगा गुरुनाथ पंडित पाटील यांनी कल्याणच्या मोटार अपघात विमा हक्क न्याय प्राधिकरणासमोर नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता

fish seller woman died in bus accident
(संग्रहित छायाचित्र) photo source फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मलंग गडाजवळील नेवाळी नाका भागात एका बस अपघातात जखमी होऊन मरण पावलेल्या मासळी विक्रेती महिलेच्या नातेवाईकाला चार लाख ६६ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश कल्याणच्या मोटार वाहन अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य अमोल हर्णे यांनी प्रतिवादी बस वाहन मालक आणि विमा कंपनीला दिले.

मोटार अपघात विमा हक्क न्याय प्राधिकरणा समोर दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून सात टक्के दराने ही भरपाई मयत महिलेच्या मुलाला देण्यात यावी, असे न्याय प्राधिकरणाचे सदस्य हर्णे यांनी सागर टुर्स ॲन्ड ट्रव्हॅल्स आणि बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले. यमुनाबाई पाटील या दिवा गावा जवळील बेतवडे गावच्या रहिवासी. त्या मासळी विक्रीचा व्यवसाय करत होत्या. मार्च २००७ मध्ये यमुनाबाई पाटील (५०) एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नेवाळी गावाजवळील काकडवाल गावात जात होत्या. या प्रवासासाठी त्या सागर टुर्सच्या बसमधून प्रवास करत होत्या. भोपर येथून त्यांनी प्रवास सुरू केला होता. बस चालक निष्काळजीपणे आणि भरधाव बस चालवित होता. नेवाळी नाका परिसरात बस आल्यानंतर चालकाच्या निष्काळजीपणामुळे बसवरील त्याचा ताबा सुटला. बस एका खोल खड्ड्यात आपटून पलटी झाली. या अपघातात यमुनाबाई गंभीर जखमी झाल्या. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. हिललाईन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आयरे गाव पालिका शाळेची दुरवस्था; विद्यार्थी, शिक्षक धोक्याच्या छताखाली

आईच्या मृत्यूला चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत मयत यमुनाबाई यांचा मुलगा गुरुनाथ पंडित पाटील यांनी कल्याणच्या मोटार अपघात विमा हक्क न्याय प्राधिकरणासमोर नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला.

आई यमुनाबाई मासे विक्रीचा व्यवसाय करुन दरमहा सहा हजार रुपये उत्पन्न मिळवित होती. त्यावर आमचा कुटुंबगाडा सुरू होता. त्यामुळे चार लाख रुपये भरपाईची मागणी प्राधिकरणासमोर करण्यात आली होती. विमा कंपनीने दावा फेटाळण्यासाठी प्रयत्न केले. बस मालक, चालक सुनावणीच्यावेळी कधीच हजर झाला नाही. न्यायालयाने पोलीस तपासाचा अहवाल, याचिकाकर्ता, विमा कंपनीचे म्हणणे ऐकून घेऊन चार लाख ६६ हजार रुपयांची भरपाई विमा कंपनी, बस मालकाने एकत्रितपणे यमुनाबाई यांच्या मुलाला देण्याचे आदेश दिले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 15:06 IST
ताज्या बातम्या