scorecardresearch

कल्याणचे जिल्हाप्रमुख विजय साळवी आयोजित हिंदुहद्यसम्राट श्री शरीर सौष्ठव स्पर्धेस न्यायालयाची परवानगी

पालिकेच्या सर्व अटीशर्तींचे पालन करुन आयोजकांनी स्पर्धा पार पाडण्याची हमी पालिकेला दिली.

कल्याणचे जिल्हाप्रमुख विजय साळवी आयोजित हिंदुहद्यसम्राट श्री शरीर सौष्ठव स्पर्धेस न्यायालयाची परवानगी
कल्याणचे जिल्हाप्रमुख विजय साळवी आयोजित हिंदुहद्यसम्राट श्री शरीर सौष्ठव स्पर्धेस न्यायालयाची परवानगी

कल्याण: शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हाध्यक्ष विजय उर्फ बंड्या साळवी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त २३ जानेवारी रोजी हिंदुहद्यस्रमाट श्री शरीर सौष्ठव स्पर्धा येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी आयोजक साळवी यांनी कल्याण डोंबिवली पालिकेतून आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या. बंड्या साळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिता-पुत्र विरोधक असल्याने राजकीय दबावातून आणि शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता पुढे करुन आयुक्तांच्या आदेशावरुन मालमत्ता विभागाने साळवी यांच्या स्पर्धेची परवानगी १७ जानेवारी रोजी रद्द केली.

स्पर्धा तोंडावर आली आहे. सर्व तयारी आणि सौष्ठवपटू स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाले असताना पालिकेने स्पर्धा रद्द केल्याने संतप्त झालेल्या आयोजक साळवी यांनी तात्काळ मुंबई उच्च न्यायालयात ॲड. आर. एस. दातार, ॲड. दुश्यंत पगारे, ॲड. दृती दातार यांच्यातर्फे धाव घेतली. ‘गणेशोत्सव काळापासून याचिकाकर्त्याला शिंदे गटात दाखल होत नाही म्हणून शिंदे सरकारकडून गणेशोत्सव देखावा, तडीपार नोटीस अशा अनेक कारणांमुळे त्रास दिला जात आहे याचा लेखाजोखा ॲड. दातार यांनी मांडला. त्याचाच पुढचा भाग म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या नावे घेण्यात आलेली स्पर्धा रद्द करणे आहे, असे ॲड. दातार यांनी न्यायायाच्या निदर्शनास आणले.

हेही वाचा >>> ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचा कानमंत्र; म्हणाले, “लोकांपर्यंत जाऊन…”

पालिकेतर्फे ॲड. ए. एस. राव यांनी १६ डिसेंबरपासून शिक्षण मतदारसंघाची आचारसंहिता ठाणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे ही स्पर्धा रद्द केली आहे, असे न्यायालयाला सांगितले. त्याचा प्रतिवाद याचिकाकर्ते साळवी यांच्यातर्फे करताना ॲड. दातार यांनी १६ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू आहे. जिल्हाप्रमुख साळवी यांनी सहा जानावेरी रोजी पालिकेला पत्र देऊन शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी यशवंतराव चव्हाण मैदान २२ आणि २३ जानेवारी रोजी उपलब्ध करुन देण्याची मागणी आयुक्तांकडे केली. आयुक्तांच्या आदेशावरुन मालमत्ता विभागाचे व्यवस्थापक भागाजी भांगरे यांनी साळवी यांना भवानीनगर मधील दिवंगत जयवंत देवळेकर क्रीडांगण दोन दिवस स्पर्धेसाठी उपलब्ध करुन देण्यास मंजुरी दिली. या मैदानाच्या भाड्यापोटी साळवी यांच्याकडून चार हजार ३६० रुपये शुल्क भरणा करुन घेतले.

पालिकेच्या सर्व अटीशर्तींचे पालन करुन आयोजकांनी स्पर्धा पार पाडण्याची हमी पालिकेला दिली. दोन महिन्यापासून जिल्हाप्रमुख साळवी ठाणे जिल्हा बाॅडी बिल्डर्स असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा भरविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा परिसरातील स्पर्धक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाले असताना अचानक पालिकेने आचारसंहितेचे कारण देऊन स्पर्धा रद्द करणे योग्य नाही. परवानगी देण्यापूर्वी पालिकेला आचारसंहिता माहिती नव्हती का, असे प्रश्न ॲड. दातार यांनी न्यायालयात उपस्थित केले.

हेही वाचा >>> VIDEO : ‘मंजिल एक दिन आयेगी…’ नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसात नरेश म्हस्केंची शायरी; म्हणाले “आमदारकीसाठी…”

आदेश रद्द

न्या. एम. डब्ल्यू. चांदवानी, न्या. सुनील शुक्रे यांनी पालिका आणि याचिकाकर्त्याच्या बाजू ऐकून पालिकेचा स्पर्धा रद्द करण्याचा आदेश रद्द ठरविला. हा आदेश काढणाऱ्या मालमत्ता प्रमुखाला कारणे दाखवा नोटिस काढण्याचे आदेश दिले, असे ॲड. आर. एस. दातार यांनी सांगितले.

“आचारसंहितेचे कारण देऊन आपण शिवसेनाप्रमुखांच्या नावे आयोजित केलेली शरीरसौष्ठव स्पर्धा पालिका आयुक्तांनी रद्द केली होती. यामागे राजकीय दबाव, आपणास मनस्ताप देणे हेच एकमेव कारण होते. न्यायालयामुळे शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी आपणास स्पर्धा घेण्याची संधी मिळाली.”

विजय साळवी, जिल्हाप्रमुख कल्याण

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 15:12 IST

संबंधित बातम्या