दररोज प्रत्येकी दीडशेहून अधिक करोनाबाधितांची नोंद

डोंबिवली : गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून करोना रुग्णसंख्येत आघाडीवर असलेल्या डोंबिवली पश्चिम आणि कल्याण पूर्व भागात आता रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. असे असले तरी यापूर्वी रुग्णसंख्या कमी असलेल्या डोंबिवली पूर्व आणि कल्याण पश्चिम भागात आता रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे चित्र आहे. या दोन्ही भागांमध्ये दररोज प्रत्येकी दीडशेहून अधिक रुग्ण आढळून येत असून या नव्या संक्रमित क्षेत्रामध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत करोना रुग्णांची एकूण संख्या ३९ हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या पाच हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सातशे पार झाली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून डोंबिवली पश्चिम आणि कल्याण पूर्व भागात करोनाचा संसर्ग वाढल्याचे चित्र होते. डोंबिवली पश्चिम भागात दररोज शंभर ते दीडशे रुग्ण आढळून येत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या भागातील रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून आता दररोज ५० ते ६० रुग्ण आढळून येत आहेत. तर, कल्याण पूर्वेतही यापूर्वी दररोज १०० ते १५० रुग्ण आढळून येत होते, तर आता ५० ते ६० रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून करोना संक्रमित क्षेत्र असलेल्या या भागात आता करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. असे असतानाच यापूर्वी रुग्णसंख्या कमी असलेल्या डोंबिवली पूर्व आणि कल्याण पश्चिम भागांत करोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढू लागला आहे. यापूर्वी डोंबिवली पूर्वेत दररोज ७० ते ८० तर कल्याण पश्चिमेत दररोज ८० ते ९० रुग्ण आढळून येत होते. परंतु आता डोंबिवली पूर्वेत दररोज १५० ते १६० तर कल्याण पश्चिमेत दररोज १२५ ते १५० रुग्ण आढळून येत आहेत.

प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ

डोंबिवली पूर्व, कल्याण पश्चिम भागातील चाळी, झोपडय़ांपेक्षा गृहनिर्माण सोसायटय़ांमध्ये करोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आढळून येत आहे. गणेशोत्सवानंतर हे प्रमाण सर्वाधिक वाढले. यापूर्वी कल्याण पूर्व, डोंबिवली पश्मिचेत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. या भागातील चाळी, झोपडय़ांमध्ये हे रुग्ण आढळून येत होते. या भागांमध्ये प्रशासनाने प्रतिजन चाचण्या, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, रुग्णांचे विलगीकरण करणे यावर भर दिला. त्यामुळे ही संख्या घटू लागली आहे. तर डोंबिवली पूर्व, कल्याण पश्चिम भागातील सोसायटय़ांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

गणेशोत्सवानंतर ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे सोसायटय़ांमधून आढळून आले आहेत. चाळी, झोपडय़ांमधील प्रमाण या तुलनेत खूप कमी होते. सोसायटय़ांमध्ये रुग्ण आढळून आल्याने तिथे अधिक संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाने संस्थात्मक अलगीकरण आणि प्रभागवार प्रतिजन चाचणी केंद्रांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. यापूर्वी करोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात उपाययोजना केल्यामुळे तेथील रुग्णसंख्येत घट झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेल्या भागांतही उपाययोजना केल्या जात आहेत.

– डॉ. प्रतिभा पानपाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी