विरार : शहरातील वाढती करोना रुग्णांची संख्या पाहता पालिकेने वालीवच्या वरुण इंडस्ट्री येथे बंद करण्यात आलेले १००० खाटांचे रुग्णालय पुन्हा सुरू केले आहे. यात १५० प्राणवायू खाटा रुग्णसेवेकरीता सुरू केल्या आहेत.

वसई-विरार परिसरात शुक्रवारीसुद्धा ९१ करोना रुग्ण सापडले आहेत. मागील महिनाभरात सातत्याने रुग्णाची संख्या वाढत असताना शहरात दुसऱ्या लाटेची संभाव्य भीती वर्तवली जात आहे. याची खबरदारी म्हणून आता पालिका सक्रिय झाली आहे. शहरातील करोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर पालिकेने सर्व कोविड उपचार केंदे्र बंद केली होती. केवळ विरार चंदनसार येथे पालिकेने १५० खाटांची सुविधा रुग्णासाठी सुरू ठेवली होती.

परंतु, करोना महासाथीवर नियंत्रण मिळवावे म्हणून पालिका शर्तीचे प्रयत्न करत आहे. पालिकेने शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालये, शिकवण्या पुन्हा बंद केल्या आहेत. तसेच, सार्वजनिक कार्यक्रम, आठवडा बाजार, लग्न समारंभ यांच्यावरसुद्धा निर्बंध लादले आहेत. तसेच, नागरिकांना मुखवटे वापरण्यास सक्ती केली आहे.

पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी माहिती दिली की, करोना प्रसार रोखण्यासाठी पालिकेने २०६ प्रतिबंधित क्षेत्र तयार केले आहेत. यात केवळ अत्यावशक सेवा सुरू राहतील. तसेच, विरार चंदनसार येथे १५० खाटांचे अतिदक्षता विभाग तयार केला आहे. तर पालिकेकडे ४८ कृत्रिम श्वसन यंत्रणा उपलब्ध केले आहेत. त्याचबरोबर शासनाकडे १ लाख लसींची मागणीसुद्धा केली आहे. जर आणखी रुग्णांची संख्या वाढली तर इतरही कोविड केंद्र आणि अलगीकरण केंद्र सुरू केले जातील. पालिकेने वरूण इंडस्ट्री येथे लसीकरण केंद्र तयार केले होते. मात्र या ठिकाणी पुन्हा करोना रुग्णांसाठी रुग्णालय तयार करण्यात आल्याने हे केंद्र बंद करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेने वसई पश्चिम, विरार पश्चिम आणि नालासोपारा पूर्व हे भागा करोनाचे अतिसंवेदनशील परिसर असल्याचे जाहिर केले आहे.