स्पर्धा परीक्षा केंद्रात २५० खाटांचे रुग्णालय, अतिदक्षतेच्या ५० खाटा

अंबरनाथ:  करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त होत असल्याने लहानग्यांसाठी अधिकाधिक आरोग्य सुविधा उभारण्यासाठी आता स्थानिक पालिका प्रशासनांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अंबरनाथ शहरात पूर्व भागात असलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रात २५० खाटांचे लहान मुलांचे कोविड रुग्णालय उभारण्यासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. यातील ५० खाटा या अतिदक्षता विभागाच्या असतील. या रुग्णालयासाठी लागणाऱ्या उपकरणांची जमवाजमव करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.

करोनाची दुसरी लाट काही अंशी ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका आताच आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका होईल असाही अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे येत्या काळात लहान मुलांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे आदेश राज्य शासनाने स्थानिक नगरपालिकांना दिले आहेत. त्याच धर्तीवर अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने लहान मुलांवर उपचार करण्यासाठी समर्पित कोविड रुग्णालय उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अंबरनाथ पूर्वेतील स्पर्धा परीक्षा केंद्रात कोविड रुग्णालय उभारले जाणार होते. मात्र आता या ठिकाणी लहान मुलांवरील उपचारासाठी यंत्रणा उभी केली जाते आहे. या केंद्रात २५० खाटांचे रुग्णालय उभारले जाते आहे. लहान मुलांमध्ये नवजात बालकापासून १६ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. यातही नवजात ते वय वर्षे ५ आणि ६ ते १६ असे दोन गट केले जातात. यातील वय वर्षे ६ ते १६ या गटातील सर्वाधिक मुलांचा भरणा असण्याची शक्यता असल्याने सर्वाधिक खाटा या मुलांना समोर ठेवून सुरू केल्या जाणार आहेत. लहान मुलांना या रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्यास या मुलांसोबत त्यांच्या मातांनाही राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यानुसार येथे खाटांची व्यवस्था पालिका प्रशासनाला करावी लागणार आहे. तसेच प्राणवायू किंवा अतिदक्षता विभागात लागणारी यंत्रणा ही लहान मुलांची बऱ्याचअंशी वेगळी असते. त्याची क्षमता, त्याचे नियंत्रण हे वेगळे असते. त्यामुळे लहान मुलांना पुरक ठरणारी यंत्रणा मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. या रुग्णालयासाठी बालरोगतज्ज्ञांची गरज लागणार असून त्यांच्या शोधासाठीही प्रRिया सुरू केली असल्याचे डॉ. रसाळ यांनी सांगितले आहे.

५० अतिदक्षता खाटा

स्पर्धा परीक्षा केंद्रात उभारल्या जाणाऱ्या २५० खाटांच्या रुग्णालयात ५० खाटा या अतिदक्षता विभागासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यातील ४० खाटा या वय वर्षे ६ ते १६ या गटासाठी तर १० खाटा या नवजात ते वय वर्षे ५ च्या गटातील मुलांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने या रुग्णालयाच्या उभारणीसाठी लागणारी यंत्रण खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. महिनाभरात हे रुग्णालय उभारण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे.