ठाणे : भारत सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सुरत येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड स्पर्धा २०२० मध्ये (आयएसएसी) कोविड इनोव्हेशन -१९ या कॅटेगरीमध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेस जाहीर झालेला राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे हरदीप पुरी यांचे हस्ते आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि एसकेडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे यांनी सोमवारी स्वीकारला. यावेळी हरदीप पुरी यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व इतर विजेत्यांची प्रशंसा केली.
आपल्यावर उद्भवलेल्या संकटांचे एका संधीमध्ये कसे रूपांतर करावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस राष्ट्रीय पातळीवरील मिळालेला कोविड इनोव्हेशन पुरस्कार -असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या वेळी काढले.
प्रथमत: जेव्हा कोविडचे संकट आले तेव्हा महापालिकेकडे अत्यंत अपुऱ्या पायाभूत सोयी-सुविधा होत्या. महापालिकेची दोन रुग्णालये आणि केवळ ४० टक्के मनुष्यबळाची उपलब्धता यावर या संकटाचा सामना करणे सर्वथा अशक्य होते, त्यामुळे आम्ही कल्याण व डोंबिवली मधील इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा, कॅम्पा व इतर डॉक्टर संघटनांशी संपर्क साधून ‘डॉक्टर आर्मी’ तयार केली. याच काळात ‘फॅमिली डॉक्टर कोविड फायटर’ ही अभिनव संकल्पना कल्याण-डोंबिवलीत राबविली. त्यामुळे करोना रुग्णांना उपचार मिळणे सहज सुलभ झाले आणि महापालिकेत मृत्युदर दोन टक्क्यांपेक्षा कमी राहण्यास मदत झाली, अशी माहिती डॉ. सूर्यवंशी यांनी या यावेळी दिली. ‘फ्रीडम टू वॉक’ या स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये पालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यास प्राप्त झालेला प्रथम पुरस्कार त्यांच्या वतीने शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांनी स्वीकारला.
