डिसेंबरअखेपर्यंत साकेत, नागला बंदर, कोलशेत किनाऱ्यांचे संवर्धन
लोकसत्ता खास प्रतिनिधी
ठाणे : शहरातील खाडीकिनारी भागांचे संवर्धन व्हावे तसेच ठाणेकरांना विरंगुळ्याचे नवे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी महापालिका विविध ठिकाणी खाडीकिनारा सुशोभीकरण प्रकल्प राबवीत आहे. त्यापैकी साकेत, नागला बंदर, कोलशेत या भागातील खाडी सुशोभीकरणाचे काम डिसेंबपर्यंत पूर्ण करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. याशिवाय मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणाचे पूर्ण काम आणि पारसिक चौपाटीचे ५० टक्के कामही डिसेंबरअखेपर्यंत उरकण्यासाठी पालिकेने कामाचा वेग वाढविल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्राला मोठय़ा प्रमाणात खाडीकिनारा परिसर लाभला आहे. या खाडीकिनारी भागाचे संवर्धन करण्यासाठी पालिका गेल्या काही वर्षांपासून उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून खाडीकिनारा सुशोभीकरण हा प्रकल्प पालिकेने काही वर्षांपूर्वी हाती घेतला. या प्रकल्पांतर्गत बोटिंग, पथवे, सायकल मार्गिका, मनोरंजन सुविधा अशा सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेऊन पालिकेने त्याचे काम सुरू केले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे वादात सापडला होता. या वादावर पडदा टाकत पालिकेने आता हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावले उचलली आहेत. ठाणे शहर, खारेगाव, साकेत, बाळकुम, कोलशेत, गायमुख, मोघरपाडा, कासारवडवली, कावेसार, रेती बंदर, पारिसक चौपाटी, मुंब्रा आणि दिवा या भागातील खाडीकिनाऱ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी येत्या डिसेंबर महिनाअखेपर्यंत साकेत, नागला बंदर, कोलशेत या भागातील खाडी सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने आखले असून त्याचबरोबर या कामाचा वेग वाढविला आहे.
मासुंदा तलावाचेही सुशोभीकरण
त्याचबरोबर मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून त्या ठिकाणी काचेचा पथवे तयार करण्याबरोबरच परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. हे कामही डिसेंबर महिनाअखेपर्यंत पूर्ण करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. त्याचप्रमाणे पारसिक चौपाटी कामातील बाधितांचे पुनर्वसन केले जाणार असून ही प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या जागेवर काम सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे वादग्रस्त जागा वगळून उर्वरित जागेवर पारसिक चौपाटीचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे येत्या डिसेंबरअखेपर्यंत चौपाटीचे ५० टक्के काम पूर्ण होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
