कल्याण- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या विषयी समाज माध्यमांमध्ये वाद्ग्रस्त, बदनामी करणारा मजकूर प्रसारित करणाऱ्या अज्ञात व्यक्ति विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना महिला पदाधिकाऱ्याच्या नावाने गुरुवारी दुपार पासून हा मजकूर समाज माध्यमात प्रसारित करण्यात आला होता.

वाद्ग्रस्त मजकूर प्रसारित करणाऱ्या अज्ञाताचा पोलीस शोध घेत आहेत. खा. शिंदे बुधवारी दुपारी कल्याण पूर्वेत शिंदे समर्थक कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी शिवसेना शाखा बंद असल्याने शाखेचे कुलुप तोडून शाखा उघडण्यात येत असल्याची चित्रफित समाज माध्यमांत प्रसारित झाली होती. शाखेत प्रवेश करताना शिवसेना महिला पदाधिकारी आशा रसाळ यांनी खा. शिंदे यांना रोखले. त्यांना तेथून बाहेर काढले असा मजकूर अज्ञात व्यक्तिने समाज माध्यमांमध्ये प्रसारित केला. याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली. अशी घटनाच घडली नसल्याचे शिवसैनिक सांगत होते.

मुख्यमंत्री चिरंजीवाची बदनामी होत असल्याने कोळसेवाडी पोलिसांनी शिवसेना पदाधिकारी आशा रसाळ यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पाचारण केले. रसाळ यांच्या चौकशीतून अज्ञात व्यक्तिने हा मजकूर समाज माध्यमांमध्ये प्रसारित केल्याचे समोर आले. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने अज्ञात व्यक्ति विरुध्द गुन्हा दाखल करून हा मजकूर प्रसारित करणाऱ्या इसमाचा शोध सुरू केला आहे. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. शिवसेना शाखेचे कुलुप तोडतानाच्या चित्रफितीविषयी कोणीही शिवसैनिक उघड बोलण्यास तयार नाही.