ऑनलाईन फसवणूक करून लाखोंचा गंडा घालणाऱ्या नायजेरियन नागरिकासह चार लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. ही चार जणांची टोळी फेसबुकवरून मैत्री करुन व्यापाऱ्यांना दुर्मिळ औषधी बीज देण्याच्या आमिषाने फसवणूक करत होती. या चौघांनी एका व्यापाऱ्याकडून ऑनलाईन दुर्मिळ औषधांचे आमिष दाखवून चक्क २० लाख ७७ हजार रुपये उकळले होते. याप्रकरणी मिरारोड येथील नयानगर पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकांसह १० जणांवर गुन्हा दाखल केला होता. यातील चौघे अटक असून इतर सहाजण फरार आहेत. या प्रकरणातील अंतिम सुनावणीसाठी एका नायजेरियनसह अन्य तिघांना मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायदंडाधिकारी यांनी या चौघांना कारावासाची शिक्षा सुनावली.

गतवर्षी मिरारोड येथील नयानगर पोलीस क्षेत्रातील व्यापारी अनिल माथुर यांना दुर्मिळ औषधी बीज देण्याचे प्रलोभन दाखवून २० लाख ७७ हजारांचा गंडा घालण्यात आला होता. अमरिकेतील ‘हेल्थ अॅण्ड वेल्थ’ या कंपनीची प्रतिनिधी असल्याचे भासवून परदेशी तरुणी कोशिया कोले हिने फेसबुकवरून मैत्री केली, आणि भारतात स्वस्तात मिळणारी औषधी बीजे दुप्पट किमतीत खरेदी करण्याचे प्रलोभन दाखवले होते. त्यानुसार, माथुर यांनी व्यवसायास इच्छुक असल्याचे सांगून कच्चा माल खरेदी करण्यासाठी ऑनलाईन रक्कम अदा केली. मात्र, रक्कम मिळाल्यानंतर ही टोळी परागंदा झाल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री पटताच माथुर यांनी नयानगर पोलिसात गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी, मिरारोड नयानगर पोलिसांनी अटक केलेल्या नायजेरियन नागरिक उजामा इलीयाझ मोनेडे (वय २४) आणि कामोठे, नवीमुंबई येथील फजल अहमद सय्यद (वय २८) या दोघांना एक वर्ष कारावास आणि १० हजारांचा दंड तर, तौफिक खाडे (वय ४७) रा. पनवेल आणि नेरूळ येथील योगेशकुमार पाटील (वय २४) यांना सहा महिने कारावास व ५ हजार दंड अशी शिक्षा न्यायालयाकडून ठोठावण्यात आली. याप्रकरणी फरार ६ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.