कल्याण शिळफाटा रस्त्यावरील नेकणीपाडा येथे कायमस्वरूपी दंगलविरोधी पथकातील वाहनात सेवा बजावून कंटाळलेल्या दोघा पोलिसांनी वरिष्ठांच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्हे उपस्थित करत थेट प्रसारमाध्यमाशी संपर्क साधला होता. वरिष्ठांविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या राजन कर्डक, जीतेंद्र निकम या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
अनेक महिन्यांपासून मानपाडा पोलीस ठाण्यातील निकम, कर्डक हे दंगलविरोधी पथकात सेवा बजावत आहेत. या दोघांनी वरिष्ठांविरोधात विधाने केली होती. वाकोला पोलीस ठाण्यातील प्रकार ताजा असल्याने या दोघा कर्मचाऱ्यांना जोर चढला आणि त्यांनी वरिष्ठांविरोधात थेट प्रसारमाध्यमाकडे मुलाखती दिल्या. आपण काम करत असलेल्या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाहीत. याच ठिकाणी सतत सेवा द्यावी लागत असल्याने हैराण झालो आहोत, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते. दरम्यान, पोलीस यंत्रणेत या दोन्ही पोलिसांना न्याय मागण्यासाठी स्वतंत्र्य यंत्रणा आहे. त्यांना वरिष्ठांकडे याबाबत म्हणणे मांडण्याची संधी होती. तेथे ते म्हणणे मांडू शकत होते. असे असताना कर्डक, निकम यांनी माध्यमांसमोर जाऊन आम्ही आत्महत्या करायची का, असे चिथावणीखोर वक्तव्य केले. वरिष्ठांची परवानगी न घेता या दोन पोलिसांनी माध्यमांसमोर म्हणणे मांडले. त्यामुळे गैरवर्तणूक केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊन मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गौतम रणदिवे यांनी गुन्हा दाखल केला आहे. उपायुक्त संजय जाधव यांनी दोघांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या तक्रारीची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.