तीन हजारांहून अधिक फरार गुन्हेगारांची विशेष शोधमोहीम!

पालघरकरांमध्ये सुरक्षिततेसाठी पुढाकार

|| नीरज राऊत

पोलीस अधीक्षकांचा निर्धार; पालघरकरांमध्ये सुरक्षिततेसाठी पुढाकार

पालघर जिल्ह्यत दृश्यमान (व्हिझिबल) पोलिसिंग करून १९९१ पासून विविध गुन्ह्यांमध्ये फरार किंवा वॉन्टेड तीन हजारहून अधिक गुन्हेगारांची पुढील काही महिन्यात  शोध घेणार असल्याचा निर्धार पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे दुचाकीसह वाहनांच्या कागदपत्रे तपासणीही सुरू असून रेतीच्या चोरटय़ा वाहतुकीवर आळा घालणर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक नागरिकाला आपण सुरक्षित आहोत, अशी भावना निर्माण होणे गरजेचे असल्याचे सांगून रस्त्यावर व भरवस्तीमध्ये घडणारे गुन्हे, महिलांवरील अत्याचार व गैरप्रकारांना पाबंदी घालण्यासोबतच दरोडय़ांचे प्रकार थांबवून प्रत्येक नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी पालघर पोलीस ठोस पावले उचलणार असल्याचे अश्वासन त्यांनी  ‘लोकसत्तेशी’ बोलताना दिले. कोणत्याही अपघातामध्ये लहान वाहनाचे नुकसान होते व वाहनचालकाला दुखापत किंवा मृत्यू ओढवतो. त्यामुळे हेल्मेट सक्ती करणार आहोत. वाहनाची कागदपत्रे तपासणी तसेच वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात आतंकवादी विरोधी पथकाने (एटीएस) आरडीएक्स व इतर स्फोटक पकडले, हे जिल्हा पोलिसांचे (आपले) अपयश आहे, हे मान्य करीत राज्य पोलिसांच्या कामाची व्याप्ती वेगळ्या स्वरूपाची असल्याने तपासामध्ये मर्यादा येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सन १९९१ पासून विविध पोलीस स्टेशनमध्ये तपास अपूर्ण राहिलेल्या (अनडिटेक्टेड) गुन्ह्यातील आरोपीचा नव्याने शोध घेण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. या सर्व उपाय योजनांमुळे पालघरमधील कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होईल तसेच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रस्त्यावर धूम्रपान करणाऱ्यांविरुद्धही कारवाई

पोलीस अधीक्षक यांनी प्रतिबंध व निषिद्ध ठिकाणी तंबाखू जन्य पदार्थाची विक्री तसेच रस्त्यावर (उघडय़ावर) धूम्रपान करणाऱ्यांविरुद्ध कोप्ता कायद्यांअंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईमधून ७७७ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

पदभार घेतल्यानंतर..

४ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील जुगार, हातभटय़ा यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. रेतीच्या चोरटय़ा पद्धतीने वाहतुकीवर रोख लावण्यासोबत वाहन तपासणीवर विशेष लक्ष आहे. वाहनांची तपासणीसाठी त्यांनी ‘ऑलआऊट ऑपरेशन’ हाती घेतले आहे.

जप्त केलेला मुद्देमाल

  • जुगार :१७ गुन्हे दाखल; २४६ आरोपी; १०.७० कोटी रुपये जप्त
  • दारुबंदी :१०५ गुन्हे दाखल; १४ आरोपी; ५४.९४ लाख रुपये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Crime in palghar