कल्याण : तोकडे कपडे का घातले असा जाब विचारत मद्यपान केलेल्या आठ जणांनी दोन तरुणींचा विनयभंग करत त्यांच्या मित्रांना बेदम मारहाण केली. रविवारी मलंगगडाच्या पायथ्याशी हा प्रकार घडला. तीन दिवसानंतर उल्हासनगर हद्दीतील हिललाइन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

रविवार असल्याने उल्हासनगरमधील दोन तरुण आपल्या मैत्रिणींना घेऊन फिरण्यासाठी मलंगगडाच्या पायथ्याशी गेले होते. ते फिरत असताना अचानक मद्यपान केलेले आठ तरुणांचे टोळके तेथे आले. त्यांनी तरुणींना तुम्ही तोकडे कपडे का घातले, असा जाब विचारला. तरुणींनी त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने त्यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या मुलींच्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण केली. तसेच तरुणींचा विनयभंग केला.

याप्रकरणी तक्रार करण्यासाठी तरुणींनी नेवाळी पोलीस चौकी गाठली. मात्र तेथील गस्ती पोलिसांनी त्यांना हिललाइन पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. या चौघांनी समाजमाध्यमांवर आपली कैफियत मांडली. या माहितीचा आधार घेत हिललाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी मद्यपींचा शोध सुरू केला आहे.