बदलापूर: बदलापूर गावात गुरुवारी दुपारच्या सुमारास एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर असलेल्या बोराडपाडा रस्त्यावर हा गोळीबार झाला. यात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालय उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बदलापूर शहरातील बदलापूर गाव परिसरात मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार किसन कथोरे यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या बाहेर बदलापूर गाव ते बोराडपाडा हा रस्ता जातो. या रस्त्यावर गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तीन ते चार जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीवर गोळीबार केला. या गोळीबारात या व्यक्तीच्या पाठीमागे खांद्यावर गोळी लागली. त्यानंतर आरोपी पसार झाले. गोळी लागलेल्या व्यक्तीला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कामानिमित्त बाहेर जात असताना तीन ते चार जणांच्या टोळीने संबंधित व्यक्तीवर गोळीबार केला. यातील एक संशयित आरोपीला काही तासात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

ज्याच्यावर गोळीबार झाला त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर संशयित आरोपीवरही तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्याचे उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले आहे. सायंकाळी गुन्हे अन्वेषण पथकाचे अधिकारीही घटनास्थळी तपासासाठी आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकारानंतर बदलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. बदलापूर शहरात काही वर्षांपूर्वी शिवसेनेचे मोहन राऊत यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी नुकताच न्यायालयाने निकाल जाहीर केला असून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे शहरात राजकीय गुन्हेगारीची चर्चा होत असतानाच ही घटना झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे अधिकारी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत होते.