पश्चिमेतील वागळे इस्टेट येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय विवाहितेचा तिच्या सासरच्यांनी छळ केल्याची घटना समोर आली आहे. मोटारसायकल घेण्यासाठी व लॉटरीचे दुकान सुरू करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये असा तगादा पीडित महिलेच्या सासरच्यांनी लावला होता. तसेच घराचे भाडे देण्यासाठीही माहेरून पैसे आणण्यासाठी पती, दिरासह नणंद व जाऊ असे सर्व तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होती. तिचे सर्व दागिनेही घरातील लोकांनी काढून घेतले. याप्रकरणी पीडित महिलेने श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात रोहिदास लक्ष्मण बनगे, प्रल्हाद लक्ष्मण बनगे, बशी प्रल्हाद बनगे, नणंद आशा मोहन शिरजळे व रेखा तसेच उषा शांतिलाल तुलमाळी आदी जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवजात अर्भक सापडले
ठाणे- पश्चिमेतील जवाहरबाग येथील अग्निशमन केंद्राजवळील एका ट्रॉलीत ठेवलेल्या पिशवीत स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एका टेम्पोच्या पाठीमागील ट्रॉलीमध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशवीत कपडय़ात गुंडाळलेले सातदिवसीय अर्भक सापडले आहे.




सुरक्षारक्षकाच्या घरात चोरी
कल्याण- उल्हासनगर कॅम्प नं. ४ मध्ये जागृती कॉलनीत राहणारे ब्रिजलाल वर्मा या सुरक्षारक्षकाच्या घरात चोरी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. वर्मा हे सुरक्षारक्षकाचे काम करत असून शनिवारी सकाळी ते कामासाठी बाहेर पडले. रविवारी सकाळी ते घरी परत आले असता घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरटय़ांनी ६२ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
खासगी गुप्तहेरास अटक
ठाणे- कोपरी येथील पारशीवाडी येथे राहणाऱ्या २१ वर्षीय मुलीने ऋषिकेश भालेराव या खासगी कंपनीच्या गुप्तहेराविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यास कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. भालेराव हा सदर मुलीचा एक महिन्यापासून पाठलाग करीत असून तिच्या मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत असल्याची तक्रार पीडित तरुणीने केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
साडेसहा लाखांचा ऐवज लंपास
अंबरनाथ- अंबरनाथ पूर्वेला राहुलनगर येथे राहणारा अनिरुद्ध खरोटे यांस चार चोरटय़ांनी मारहाण करून त्यांच्याकडील साडेसहा लाखांचा ऐवज चोरून पळ काढल्याची घटना रविवारी घडली. व्यवसायाने सोनार असलेले खरोटे हे रविवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी जात असताना चार चोरटय़ांनी त्यांना कॅबिनरोड येथे अडवले. त्यांच्यावर स्टीलच्या पट्टीने पाठीवर, हातावर वार केले व त्यांच्या हातातील पिशवीमधील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सहा लाख ५० हजार ९०० रुपये किमतीचा माल चोरून नेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.